११ वर्षांनंतर निकाल डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा; तिघे निर्दोष, दोन आरोपींना जन्मठेप

पुणे सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

११ वर्षांनंतर निकाल डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा; तिघे निर्दोष, दोन आरोपींना जन्मठेप

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणीचा निकाल अखेर लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने तब्बल ११ वर्षांनंतर हा निकाल दिला आहे. पुणे सीबीआय विशेष न्यायालयाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.

न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यांना ५ लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पाच आरोपीपैकी दोन आरोपी दोषी तर, इतर तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनावळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुकत्ता करण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला आहे. विरेंद्र तावडे यांचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. तर विक्रम भावे आणि संजीव पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

आरोपी विरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा आरोप होता, त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. संजीव पुनावळेकर यांनी मारेकऱ्यांना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. विक्रम भावे यांनाही निर्दोष मुक्त केले आहे. पुराव्यांअभावी हा निर्णय घेण्यात आला आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदूरे यांना भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि ३४ खाली दोषी ठरविले गेले आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या निकालाबाबत बोलताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी बोलताना सांगितले की, न्यायालयाचे निकालाचे आम्ही स्वागत करतो. या प्रकरणात २ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. जे निर्दोष सुटले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

हे ही वाचा:

‘गरज पडल्यास इस्रायल एकट्याने लढेल’

‘२,९०० पीडित आहेत कुठे?’

रतलाममधील काँग्रेस उमेदवार म्हणतो, दोन बायका असतील तर देऊ दोन!

लाच म्हणून मागितला मोबाईल फोन; महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

प्रकरण काय?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी ७.१५ सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या.

Exit mobile version