सायबर चोरट्यांनी एका तरुणाला आयर्लंडवरून ‘अधिकारी’ बोलत असल्याची बतावणी करून तब्बल ५.२ लाखांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. ठाणे पोलिसांच्या मदतीने तरुणाला त्याचे पैसे परत मिळाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ठाण्यातील २४ वर्षीय तरुण त्याचे उच्च शिक्षण आयर्लंडमधील डब्लिन विद्यापीठात घेत असून त्याच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने ५.२ लाख रुपये मागितले. फसवणूक झाल्याचे कळताच तरुणाच्या आईने चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तरुणाला फोन करून असे सांगण्यात आले की, त्याने काही वेबसाइट्सला भेटी दिल्या आहेत, ज्या अमेरिकेत बंद आहेत. त्यामुळे हॅकर्स त्याच्या बँक खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात. ते सुरक्षित ठेवण्यासाठी चोरट्यांनी काही पैशांची मागणी केली. भीतीपोटी तरुणाने सांगितलेली रक्कम चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात देऊ केली. त्यानंतर ही गोष्ट त्याच्या आईला सांगताच तिने काहीतरी गडबड असल्याचे समजून त्वरित चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
हे ही वाचा:
२०२५ मध्ये चीन तैवानवर कब्जा करणार?
‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’
NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?
गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलिसांनी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्याची माहिती काढताच ते खाते नवी दिल्लीतील रोहिणी सेक्टरमधील एका बँकेचे असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्वरित बँकेशी ई- मेलच्या माध्यमातून संपर्क साधून या फसवणुकीबद्दल कळवले. तसेच संबंधित बँक खात्याचे व्यवहार थांबवण्यास सांगून पीडित तरुणाचे पैसे त्यांना परत करण्यास सांगितले. ही सर्व कारवाई लगेचच झाल्यामुळे तरुणाचे पैसे परत मिळाले, जर चोरट्यांनी ते दुसऱ्या बँक खात्यात घेतले असते, तर पैसे मिळणे अशक्य झाले असते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत.