राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची महासंचालक पदावरून बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली आहे, राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रश्मी शुक्ला या मागील काही वर्षांपासून वादग्रस्त अधिकारी ठरल्या होत्या, राजकीय विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणुक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव बदलीचे निर्देश देऊन ५ नोव्हेंबर पर्यत पोलीस महासंचालक पदाचा पदभार सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्याकडे देण्यात यावे असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ देऊन त्यांना पोलीस महासंचालक पदावर ठेवण्यात आले होते, मात्र निवडणुकीच्या काळात रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
दरम्यान सोमवारी निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव यांना पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले आहे,तसेच त्यांचा पदभार सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे.
हे ही वाचा:
शिवसेना, धनुष्यबाण ही शिंदे, उद्धव यांची प्रॉपर्टी नाही!
अकबर, एन्थनी मागे सरले, आणि जरांगे हादरले… मालकाच्या इशाऱ्यावरून माघार!
हिजाबविरोधात इराणमध्ये विचित्र आंदोलन
राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर अधिकारी यांची निवड करण्यासाठी ३ आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करून त्यांची नावे उद्यापर्यत निवडणूक आयोगाकडे दुपारी १ वाजेपर्यंत देण्यात यावे असेही निर्देश आयोगाने मुख्य सचिवांना दिले आहे.
पोलीस महासंचालक पदावर राज्यातील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यामध्ये सर्वात पुढे नाव मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाची चर्चा असून संजय वर्मा हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याची समजते.