राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी (९जानेवारी) रोजी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारल्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेत बोलताना रश्मी शुक्ला यांनी राज्यातील महिलांची सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले. त्याचबरोबर वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल असे शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था चांगली आहे, या पुढेही राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे अधिक लक्ष दिले जाईल
असेही शुक्ला यांनी म्हटले आहे.
राज्यात होणाऱ्या अपघाताबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी चिंता व्यक्त करून राज्यातील अपघाताच्या घटना टाळण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल असे शुक्ला म्हणाल्या. मी सकारात्मक दृष्टीने पदभार स्वीकारत आहे,आणि कामाला सुरुवात करीत आहे, महाराष्ट्र पोलीस कोणत्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही असे शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत ग्वाही दिली.
मी महाराष्ट्रात ३३ वर्षे काम केले आहे, महाराष्ट्र माझे घर आहे, पुन्हा महाराष्ट्रात येऊन बरं वाटत. महाराष्ट्रातील जनतेला आपण असुरक्षित आहोत असे जाणवू देणार नसल्याचे शुक्ला यांनी म्हटले. शुक्ला यांना पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलन संदर्भात प्रश्न विचारले असता मी अधिकाऱ्यासोबत याबाबत चर्चा करू असे उत्तर शुक्ला यांनी दिली. तसेच मागील दोन वर्षात त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगबाबत काही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्याच्यावर बोलणे टाळत “मी सकारात्मक दृष्टीने पदभार स्वीकारला असून मी चांगल्या वातावरणात कामाची सुरुवात करीत आहे, त्यामध्ये तुमचाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे असे बोलून शुक्ला यांनी पत्रकारांचे प्रश्न टाळले.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड!
मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!
प्रयागराज, अयोध्या नंतर गाझियाबादलाही मिळणार नवीन नाव!
लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवं विमानतळ बांधणार; नागरी, लष्करी विमाने उतरवता येणार
रश्मी शुक्ला या महाराष्ट्र कॅडर १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहे, रश्मी शुक्ला यांनी नाशिक, नागपूर,पुणे, पुणे ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले असून पुण्यात त्या पोलीस आयुक्त होत्या. राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) प्रमुख असताना फोन टॅपिंग प्रकरणात त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल झाला होता.
रश्मी शुक्ला या राज्याच्या ४६ व्या पोलीस महासंचालक असून राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. रश्मी शुक्ला यांचा पोलीस सेवेतील कालावधी केवळ सहा महिन्यांचा असून येत्या ३०जून २०२४ रोजी त्या सेवानिवृत्त होत आहे.