केरळ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे मल्याळम चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू याच्याविरुद्ध एका अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (२८ मे), एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका तरुण अभिनेत्रीच्या तक्रारीच्या आधारे दिग्दर्शकाविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, दिग्दर्शकाने हे आरोप फेटाळून लावले असून वैयक्तिक वैमनस्यातून हे आरोप झाल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोची शहर पोलिस आयुक्तांना ही तक्रार प्राप्त झाली. मात्र ही घटना नेदुम्बसेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानंतर ती येथे हस्तांतरित करण्यात आली. ओमर लुलूवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७६ (बलात्कारासाठी शिक्षा) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. नेदुंबसेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पीडितेचे जबाब नोंदवले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमरने या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान अनेक ठिकाणी फिर्यादीला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तिने पुढे सांगितले की, दिग्दर्शकाने तिला त्याच्या चित्रपटात संधी देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील एकमेव आरोपी लुलू याला चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिलेने प्रथम कोची शहर पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पलारीवट्टम पोलिसांनी तपास केला. मात्र, बलात्काराची घटना नेदुंबसेरीजवळ घडल्याचे लक्षात घेऊन हे प्रकरण नुकतेच आमच्याकडे वर्ग करण्यात आले. आम्ही आयपीसी कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता या प्रकरणातील एकमेव आरोपी असलेला चित्रपट दिग्दर्शक ओमर लुलू यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.”
या आरोपांना उत्तर देताना ओमर लुलूने आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत. मंगळवारी, त्याने सांगितले की तरुण अभिनेत्रीने त्याच्यावर लावलेले लैंगिक छळाचे आरोप वैयक्तिक वैमनस्यातून आले आहेत. त्याच्याकडून पैसे उकळणे, हा यामागील हेतू असू शकतो, असेही त्याने सांगितले. लुलूच्या म्हणण्यानुसार, त्याची या अभिनेत्रीशी घट्ट मैत्री होती आणि तिने त्याच्या शेवटच्या चित्रपटात काम केले होते. तिच्या तक्रारीचे मूळ त्यांच्या तुटलेल्या मैत्रीमुळे आणि सध्या सुरू असलेल्या एका चित्रपटात तिला भूमिका नाकारण्यात आल्याने तिच्या नाराजीमध्ये असू शकते, अशी शक्यता दिग्दर्शकाने वर्तवली आहे. तसेच, पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
अरविंद केजरीवाल यांचे खोटे पुन्हा उघड
प्रवाशांचे होणार मेगा हाल! मध्य रेल्वेवर ६३ तास आणि ३६ तासांचे दोन मेगाब्लॉक
डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल
स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी फाडला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो!
एका वृत्तपत्रानुसार, ओमर लुलूने आरोप फेटाळून लावले आहेत. ‘माझी या मुलीशी खूप दिवसांपासून मैत्री आहे. ती माझ्यासोबत अनेक दौऱ्यात होती मात्र, आमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आणि आम्ही सहा महिने संपर्कात नव्हतो. माझ्या नुकत्याच आलेल्या चित्रपटातही तिने काम केले आहे. आता माझा नवीन चित्रपट सुरू होताच ती अशी तक्रार घेऊन पुढे आली. चित्रपटात संधी न मिळाल्याने तिची झालेली निराशा हा अशा आरोपामागील हेतू असू शकतो. काहीवेळा, हा पैशांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नाचा भागही असू शकतो,’ असा दावा त्याने केला आहे.