बंगळूरू विमानतळावरून सोने तस्करी प्रकरणात कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला अटक करण्यात आली होती. १४.८ किलो सोन्यासह तिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यानंतर या प्रकरणात तपासादरम्यान अनेक वेगवेगळ्या बाबी उघडकीस आल्या होत्या. अशातच आता रान्या राव हिने चौकशी दरम्यान मोठी कबुली दिली आहे.
रान्या राव हिने सोने खरेदीसाठी हवालाद्वारे पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती तस्करी विरोधी एजन्सी डीआरआयने मंगळवारी न्यायालयात दिली. जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने २७ मार्चपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. रान्या राव हिच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान, डीआरआयचे प्रतिनिधित्व करणारे वकील मधु राव म्हणाले की, अधिकाऱ्यांनी रान्या राव यांच्याविरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरू करण्यासाठी कलम १०८ अंतर्गत नोटीस बजावली आहे. या चौकशीचा उद्देश आर्थिक अनियमिततेचे प्रमाण आणि कायद्याचे कोणतेही संभाव्य उल्लंघन निश्चित करणे आहे. रान्या रावचा जामीन अर्ज आतापर्यंत दोनदा फेटाळण्यात आला आहे, एकदा कनिष्ठ न्यायालयाने आणि एकदा आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने.
रान्या राव हिला बंगळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी तिच्याकडून १२.५६ कोटी रुपयांचे सोन्याचे बार जप्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली तेव्हा २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, डीआरआयने दावा केला आहे की, रान्या राव आणि तिचा मित्र तरुण राजू यांनी दुबईला २६ वेळा प्रवास केल्याचे पुराव्यातून समोर आले आहे. तरुण हा रान्याचा मित्र असून सोन्याच्या तस्करी प्रकरणात आरोपी आहे. रान्याने तरुणच्या खात्यात पैसे पाठवले आणि त्याचे तिकीट बुक केले, जो नंतर दुबईहून हैदराबादला गेला, असे अधिकाऱ्यांनी उघड केले होते. तपास यंत्रणांना संशय आहे की, एकाच दिवसात सुरू असलेल्या या प्रवासाचा वापर भारतात सोन्याची तस्करी करण्यासाठी केला जात होता. २०२३ ते २०२५ दरम्यान रान्या रावच्या ५२ दुबईच्या सहलींबद्दल आणखी एक संशयास्पद माहिती होती. या सर्व फेऱ्यांपैकी ४५ फेऱ्या या एक दिवसीय होत्या. जानेवारी २०२५ मध्ये रान्या हिने २७ वेळा दुबईला भेट दिली. यासाठी ती बंगळूरू, गोवा आणि मुंबईमधून प्रवास करत होती.
हे ही वाचा..
कुणाल कामराला पुन्हा खुमखुमी, नवे गाणे केले पोस्ट
दिशा सालियन प्रकरण: बॉलीवूड कलाकारांसह आदित्य ठाकरेंविरोधात नवी तक्रार
जयकुमार गोरेंना अडकविण्यात शरद पवारांची माणसं, सुप्रिया सुळे, रोहित पवारांचे आरोपींना फोन!
जगातील सर्वात जुनी डाळ, जी पोटातील पथरी देखील विरघळवण्याची क्षमता ठेवते
३ मार्च रोजी बेंगळुरू विमानतळावर रान्या रावला अटक करण्यात आली, तेव्हा तिच्या कंबरेला आणि पायांना पट्ट्या आणि टिश्यूने गुंडाळलेले सोन्याचे बार आढळले होते. जप्त केलेले सोने २४ कॅरेटचे होते आणि त्याचे वजन १४.८ किलो होते, ज्याची किंमत १२.५६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यात तिच्या सावत्र वडिलांचे नावही समोर आले आहे. डीजीपी रामचंद्र राव यांच्या मदतीने हे केले जात असल्याचे आरोप झाले होते.