राम मंदिर आणि उज्जैनच्या महाकाळ मंदिराला मिळाली धमकी

मंदिर परिसरात वाढवली सुरक्षा

राम मंदिर आणि उज्जैनच्या महाकाळ मंदिराला मिळाली धमकी

देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना अयोध्येचे राम मंदिर, उज्जैनचे महाकाल मंदिर आणि तिरुपतीचे इस्कॉन मंदिराला धमकीचा ईमेल आणि पत्र मिळाले आहे. पोलिसांना ईमेल आणि पत्रांद्वारे मंदिरांवर दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्यानंतर मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मंदिरांच्या आत आणि बाहेर नजर ठेवली जात आहे.

दोन दिवसांनी अयोध्येत दिव्यांचा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे जगभरातून प्रभू रामाचे भक्त अयोध्येत पोहोचत आहेत. मात्र, या धमक्या आणि हल्ल्यांच्या भीतीने खळबळ उडाली असून सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. दरम्यान, अयोध्या पोलिसांनी रफिक नावाच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडून जप्त केलेले स्फोटक फटाके बनवण्यासाठी वापरले जात असले तरी सुरक्षा एजन्सी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाहीत.

अयोध्येप्रमाणेच उज्जैनच्या महाकाल मंदिराचीही सुरक्षा वाढवण्यात आली असून या मंदिरालाही धमकी देण्यात आली आहे. राजस्थानच्या हनुमानगड रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना एक पत्र प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये ३० ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी महाकाल मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर असल्याचे सांगितले आहे. यासोबतच राजस्थानातील अनेक मंदिरेही त्यांचे लक्ष्य आहेत. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर महाकाल मंदिराची सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

शरद पवारांची पाचवी यादी; पंढरपूर, माढा जागेवर दिले उमेदवार

पंतप्रधान मोदींकडून ५१ हजार नोकऱ्यांची दिवाळी भेट

भाजपाची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत १४८ जागांवर दिले उमेदवार!

केरळमध्ये मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा भीषण स्फोट, १५० हून अधिक जखमी

तिरुपती येथील तिरुमला देवस्थानमवर दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. रविवारी तिरुपतीच्या इस्कॉन मंदिराला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. इसिसचे दहशतवादी मंदिर उडवून देतील, अशी धमकी ईमेल पाठवणाऱ्याने दिली आहे, त्यानंतर मंदिर प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. माहिती मिळताच तिरुपती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मंदिराची झडती घेतली. मात्र, मंदिर परिसरातून कोणतेही स्फोटक किंवा आक्षेपार्ह साहित्य सापडले नाही.

Exit mobile version