दिव्यांगांच्या डब्यातून सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे, असे असतानाही दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याचे धाडस सामान्य प्रवासी करतात. त्यामुळे या घुसखोरीला प्रतिबंध केला जावा यासाठी अपंग प्रवाशांकडून सातत्याने कारवाईची मागणी केली जाते. सध्या रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रवाशांवर कारवाई केली जात आहे.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना नुकतीच रेल्वे प्रवासासाठी मुभा देण्यात आली. मात्र त्यातही अनेक प्रवासी नियमांचे पालन न करता प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातही धडधाकट प्रवासी घुसखोरी करत असल्याचे समोर आले आहे अशा प्रवाशांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल ९४ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे; तर त्यांच्याकडून सुमारे ५८ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
हे ही वाचा:
भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश
ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?
दिव्यांगांच्या राखीव डब्यातून धडधाकट प्रवासी प्रवास करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम उघडली आहे. कल्याण रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने दिव्यांग डब्यात गस्त वाढवली असून अवैध प्रवास करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते.
जानेवारी ते २८ ऑगस्टपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण ९४ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर करून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्याकडून सुमारे ५८ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात २८ जणांवर रेल्वेने कारवाई केली होती.