भेसळयुक्त दूध विकणाऱ्या सहा जणांना अटक

सी.बी.कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; १ हजार लिटर दूध घेतले ताब्यात

भेसळयुक्त दूध विकणाऱ्या सहा जणांना अटक

मुंबई पाेलिसांनी मुंबईत भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर माेठी कारवाई केली आहे . नामांकित कंपन्यांच्या दूधामध्ये अशुद्ध पाणी भरून भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्या टाेळीवर सी.बी. कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखेनं छापा टाकून माेठी कारवाई केली आहे. यामध्ये पथकाने १,०१० लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई शहरातील शाहूनगर पोलीस ठाणेच्या हद्दीतील ए. के. गोपाळनगर येथील झोपडपट्टीतल्या काही घरांमध्ये गोकुळ, अमुल, या नामांकित कंपनीच्या दुधात अशुध्द पाणी भरून नागरिकांना विक्री करत असल्याची माहिती सी. बी. कंट्रोल आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली हाेती. त्यानुसार मुंबई शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर व अवैद्य धंदयावर बेधडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पाेलिस आयुक्तांनी दिले.


मिळालेल्या माहितीच्या आधारे ए.के. गोपालनगर, संत कबीर मार्ग, ६० फिट रोड, धारावी येथे सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने एकूण सहा वेगवेगळी पोलीस पथके तयार करून सदर घरांवर छापा मारला. या छाप्यामध्ये येथील घरांमध्ये दुधाच्या भरलेल्या पिशव्या व अस्वच्छ वापरलेल्या रिकाम्या पिशव्या तसेच भेसळयुक्त दुधाने भरलेल्या प्लॅस्टीकच्या बादल्या, पेटत्या मेणबत्त्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टीकचे नरसाळे इत्यादी. साहीत्य आढळून आले. त्यापैकी काही पिशव्या हातात घेवुन त्याची पाहणी केली असता, त्या पिशवीवरील सीलच्या ठिकाणी कापलेले असल्याचे दिसले.. त्यात अशुध्द पाणी भरून दूधात भेसळ करीत असल्याचे आढळून आले.


या छाप्यामध्ये पाेलिसांनी गाेकुळ, अमूल या नामांकित कंपन्यांचे ६० हजार ६०० रुपये किंमतीचे एकूण १,०१० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. या दुधाचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडुन पंचनाम्याअंतर्गत परिक्षणासाठी नमुने घेण्यात आले आहेत. या छापा कारवाईमध्ये एकूण सहा जणांना ताब्यात शाहूनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांसह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ कलमान्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून पाेलिस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version