महादेव बेटिंग ऍप प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने कारवाई सुरू केली असून शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी एका बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकण्यात आला. ईडीने मुंबईतील कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर छापा टाकला. कुरेशी प्रोडक्शन हाऊसने चित्रपट बनवण्यासाठी महादेव ऍपचे फाऊंडर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून हवाला पैसे घेतले होते. त्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी भागात ईडीने छापे टाकले आहेत.
महादेव बेटिंग ऍप प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने अभिनेता रणबीर कपूर याला चौकशीसाठी बोलावणे धाडले होते. तर, कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि हिना खान यांचीही नावे जोडली गेली आहेत. अजूनही अनेक बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारवर आहेत.
ऑनलाइन बेटिंग ऍपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आतापर्यंत ईडीने चार जणांना अटक केली आहे. सुनील दममानी, अनिल दममानी, चंद्रभूषण वर्मा आणि सतीश चंद्राकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या माध्यमातून प्रमोट झालेल्या कंपनीने युएई मध्ये एका भव्य लग्नाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अंदाजे २०० कोटी रोख रुपये खर्च करण्यात आले होते. यातील बहुतांश पैसा लग्नात परफॉर्म करणाऱ्या सेलिब्रिटींना गेला. रोख रक्कमेत हा पैसा त्यांना देण्यात आला. तसेच महादेव बेटिंग ऍप ऑपरेट करण्यासाठी मलेशिया, थायलंड, भारत, यूएई येथे कॉल सेंटर उघडण्यात आले. तेथून ऑनलाइन सट्टेबाजी केली जात होती. दरम्यान, महादेव बेटिंग ऍपच्या माध्यमातून हजारो कोटींचे व्यवहार झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा:
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ‘शतक’
गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी
मुंबईतील कुरेशी प्रोडक्शन हाऊस वसीम आणि तबस्सुम कुरेशी चालवतात. सध्या हे प्रॉडक्शन हाऊस बॉलीवूडच्या एका टॉप स्टारला घेऊन बिग बजेट चित्रपट बनवण्यात गुंतले आहे. हा चित्रपट स्थानिक भाषेत बनवला जात असून तो इतर भाषांमध्ये डब केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.