नोकरी सोडली, कायद्याचा अभ्यास केला आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना दिली शिक्षा

नोकरी सोडली, कायद्याचा अभ्यास केला आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना दिली शिक्षा

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने १० वर्षे कायदेशीर लढा देऊन स्वतःच्या पित्याच्या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. यासाठी या मुलाने स्वतःची नोकरी सोडली, त्यानंतर कायद्याचा अभ्यास करून वकील झाला आणि पित्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला. सुरुवातीच्या खटल्यात पुराव्याअभावी दोन आरोपींची न्यायालयाने मुक्तता केली होती. मात्र वकील झाल्यानंतर आकाशने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोन आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा मिळवून दिली.

हे प्रकरण नोएडास्थित रायपूर गावात १० वर्षांपूर्वी घडले होते. ३१ डिसेंबर २०१३ रोजी आकाशचे पिता पालेराम घरी असताना गावातील राजपाल चौहान आणि त्यांची तीन मुले दुचाकीवरून आली आणि त्यांनी चार गोळ्या पालेराम यांच्यावर झाडल्या. त्यात पालेराम यांचा जागीच मृत्यू झाला. पालेराम हे गावाजवळ होणाऱ्या अवैध खाणकाम आणि अतिक्रमणाविरोधात लढा देत होते. त्यावरूनच त्यांची हत्या झाल्याचे सांगितले गेले.

वकील आकाशने सांगितले की, त्याचा भाऊ रवींद्र चौहान पिता पालेराम यांच्या हत्येचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. त्यालाही मारेकऱ्यांनी ठार केले होते. रवींद्रचे शव २१ जून २०१४मध्ये मिळाले होते. तक्रारीनंतरही स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी कोणताही तपास केला नाही. त्यामुळे रवींद्र चौहानचा मृत्यू आताही गूढ मानला जात आहे. तर, पालेराम यांची हत्या राजपाल चौहान, त्यांचा मुलगा सोनू उर्फ सूरज, कुलदीप आणि जितेंद्र यांनी केली होती, असे आकाशने सांगितले.

या प्रकरणी न्यायालयात नीट केस मांडली गेली नाही. मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी, यासाठी आकाश सतत न्यायालयात जात असे. याच दरम्यान आकाशची भेट तत्कालीन डीजीसी क्रिमिनिल पदावर नियुक्त असलेल्या केके सिंह यांच्याशी झाली. त्यांनी त्याला वकिली करण्याचा सल्ला दिला. पित्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आकाशला हा मार्ग योग्य वाटला आणि त्याने तसेच केले.

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींनी खासदारांना सांगितलं, मोदीजी नका म्हणू मोदी म्हणा

नो वन किल्ड दिशा…

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर

कठोर मेहनत आणि चिकाटीने आकाशने कायद्याचा अभ्यास सुरू केला. वकील झाल्यानंतर १० वर्षे त्याने हा खटला चालवला आणि दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात यशस्वी ठरला. या दरम्यान आकाशला अनेकदा धमक्याही मिळाल्या आणि प्रकरण मिटवण्यासाठी पैशांचे आमिषही दाखवले गेले. मात्र तो बधला नाही. ज्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली, त्यापैकी एक दिल्ली पोलिस दलात हवालदार आहे.

Exit mobile version