भांडुपमधील एका शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकत असलेल्या एका चार वर्षीय मुलीवर ३६ वर्षीय शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना ९ डिसेंबर २०१४ रोजी घडली होती. लहान मुलीने पोटदुखीची तक्रार केल्यावर अधिक चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला होता. विशेष पोक्सो न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीअंती या शिक्षकास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरोधात त्याने अपील केले होते. मात्र खंडपीठाने त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
पीडित मुलीने या प्रकरणी पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्यावर अत्याचार करणारे छोटे सर असल्याचे म्हटले. मात्र कोणीही मला छोटे सर म्हणत नाही. उलट शाळेच्या मुख्याध्यापकांना छोटे सर म्हटले जाते. त्यामुळे पीडितेकडून गोंधळ होऊन तिने अपराध्याला ओळखायला चूक केली, असा युक्तिवाद दोषी शिक्षकाने केला. मात्र पुरावे लक्षात घेता मुख्याध्यापकांना कोणीही छोटे सर म्हणत असल्याचे दिसत नाही आणि पीडितेची साक्ष नोंदवताना तिने आरोपीकडे बोट दाखवून छोटे सर म्हणून ओळखले त्यात कोणतीही चूक केली नसल्याची नोंद निकालात आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश
कल्याण सिंह यांच्या निधनानाने उत्तर प्रदेशात ३ दिवसांचा दुखवटा
पंतप्रधान मोदींचे खास संस्कृत ट्विट! म्हणाले…
या प्रकरणात गोवण्यात आल्याचे आरोपीचे म्हणणेही न्या. नितीन जामदार आणि न्या. चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले. अशा गुन्ह्याने समाजावर मोठा आघात होतो. ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकाच्या हवाली करतात त्या विश्वासालाच तडा जातो. अशा घटनांचे खूप व्यापक आणि दूरगामी परिणाम असतात. अशा घटनांमुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर आणि तरुणपणातही प्रचंड परिणाम होतो. या प्रकरणात न्यायालयाने दोषीला दिलेली शिक्षा योग्यच आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली आहे.