पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

पुणे पोलीस आयुक्तलयात चौकशी सुरू

पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

पुण्यात एका नामांकित बिल्डरच्या अल्प्वायीने मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडले होते. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी वेदांत याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून त्याचे वडील विशाल आणि आजोबा सुरेंद्र हे अटकेत आहेत. याप्रकरणी रोज नव्याने माहिती समोर येत असून प्रकरणाचा उलगडा होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले असून आता आणखी धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या वेदांतला वाचवण्यासाठी यंत्रणाचं कामाला लावण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. याचा तपास करून दोन पोलिसांना निलंबित देखील करण्यात आले. मात्र, आता वेदांतला वाचविण्यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही मदत केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ससून रुग्णालयामधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी केली जात आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे आता जनतेमधून आणखी संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!

शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार

योगी आदित्यनाथ एकेकाची मस्ती उतरवण्यात वाकबगार आहेत!

भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी!

अल्पवयीन आरोपीने मद्य पिऊन आलिशान पोर्शे कार चालवली. भरधाव वेगात जात असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन असल्याने आरोपीला १५ तासाच्या आत जामीन देखील मिळाला. हे प्रकरण चांगलंच तापलं आणि पुढील कारवाईला वेग आला.

Exit mobile version