पुणे अपघात प्रकरण: चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक

पुणे पोलिसांची कारवाई

पुणे अपघात प्रकरण: चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक

पुण्यात कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अल्पवयीन मुलगा वेदांत हा बालसुधार गृहात आहे तर त्याचे वडील विशाल अग्रवाल हे अटकेत आहेत. अशातच आता वेदांत याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई करत अटक केली आहे. चालकाला डांबून ठेवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन आरोपीने मद्य पिऊन आलिशान पोर्शे कार चालवली. भरधाव वेगात जात असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन असल्याने आरोपीला १५ तासाच्या आत जामीन देखील मिळाला. हे प्रकरण चांगलंच तापलं आणि पुढील कारवाईला वेग आला. आता या प्रकरणात आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाला डांबून ठेवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली होती. आपण कार चालवली असं सांगण्यासाठी चालकावर दबाव टाकण्यात आला होता. कोणी दबाव टाकला याचा शोध घेण्यात येईल, असं अमितेश कुमार म्हणाले होते. त्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आलीये. त्यांनी चालकाला धमकवल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ज्या वेळी अपघात घडला त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या शेजारी ड्रायव्हर बसला होता. गंगाराम पुजारी याला सुरेंद्र कुमारने डांबून ठेवले आणि योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना सुट्टीच्या न्यायालयासमोर दाखल करण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

‘माझा तुरुंगवास स्वातंत्र्य चळवळीसारखा’

आता व्हीआयपींनाही राम मंदिरात फोन नेण्यास बंदी

नुपूर शर्मांच्या हत्येचा कट: मौलवी सोहेलच्या अटकेनंतर आणखी दहशतवादी पकडले

हम तो डुबेंगे सनम…काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

या प्रकरणी विशाल अग्रवालवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेंद्र कुमार आणि विशाल या दोघांनी मिळून ड्रायव्हर गंगाराम पुजारीला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे. सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलीस ताबा घेणार आहेत.

Exit mobile version