रमण राघव, बियर मॅन यांच्यानंतर मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत पाहायला मिळाली. अवघ्या १५ मिनिटांत दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या या सायको किलरने केली. फुटपाथ वरील व्यक्तींच्या हत्या करणाऱ्या सायको किलरला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शनिवारी भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात अवघ्या १५ मिनिटांत दोघांची हत्या झाली होती. आरोपीने दोन्ही ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून हत्या केली होती. त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी नराधम आरोपीला शोधून काढले आहे. आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने या हत्या सहज म्हणून केल्या असल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा:
एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण
रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’
बंदूक रोखून जालन्यात लुटली बँक
‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पिटलमध्ये
अटक केलेल्या आरोपीचे नाव सुरेश शंकर गौडा असे असून २०१५ सालीही त्याने अशाच प्रकारे कुर्ल्यात एक हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आरोपी गौडाने अशा अनेक हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलीस तपासादरम्यान फूटपाथवर झालेल्या सर्व हत्यांच्या केसेस पडताळून पाहणार आहे.
२०१५ सालच्या हत्येच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती, मात्र पुराव्याअभावी त्याची २०१६ साली सुटका झाली होती. सध्या आरोपी तुरुंगात असून भायखळा पोलीस दुसऱ्या हत्येच्या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहेत.