पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद उमटले असून भाजपा युवा मोर्चाने जोरदार निषेध नोंदवला आहे. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी एसएफआयचे कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दोन्ही संधटनांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने विद्यापीठ परिसरात गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग काढण्यात आली होती. तसेच काही आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. या घटनेचा अभाविपने निषेध नोंदवला होता. तसेच विद्यापीठाने तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने अखेर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली.
आंदोलकांनी आंदोलन करण्याची पूर्व कल्पना दिल्यामुळे पुणे विद्यापीठात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच मोदींबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला अटक करण्याची मागणीही केली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनी या निदर्शनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी शाब्दिक चकमक झाली आणि वातावरण अधिकच तापलं होतं.
हे ही वाचा:
मुंबईहून सिंधुदुर्गला विमान गेलं पण आकाशात घिरट्या घालून माघारी आलं
ललित पाटीलसह त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई
भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम
हा वाद अधिक चिघळताचं पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आंदोलकांची धरपकड सुरू केली. तब्बल तासभर चाललेल्या या वादानंतर सर्वांना शांत करण्यात पोलिसांना यश मिळालं. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठ परिसरात अजूनही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.