पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तरीही वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवार, १० जून रोजीच्या नमाजानंतर दिल्ली, लखनौ, कोलकातामध्ये मुस्लिमांनी निदर्शने केली. यावेळी मुस्लिमांनी नुपूर शर्माच्या अटकेची मागणी केली आहे. नुपूर शर्मा यांच्या पैगंबर यांच्या वरील वक्तव्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर देश- विदेशात टीका केली जात आहे. मात्र, भाजपने नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे, तर नवीन जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
दिल्लीतील जामा मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिमांनी निदर्शने केली आहेत. यावेळी त्यांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर उत्तर प्रदेशामधील प्रयागराजमध्ये मुस्लिमांनी आंदोलनानंतर दगडफेक केली. बंगालमध्ये कोलकाता आणि हावडा येथेही निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रात सोलापूर येथेही निदर्शने करण्यात आली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या.
उत्तर प्रदेशमधील देवबंदमध्येही काही मुस्लिमांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. बंगालमधील हावडा आणि कोलकाता येथेही मुस्लिमांनी राष्ट्रीय महामार्गावर निदर्शने करून टायर जाळले. यावेळी आंदोलकांनी दगडफेकही केली, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
महाराष्ट्रात औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी खासदार जलील सुद्धा उपस्थित असून, शेकडो कार्यकर्ते आंदोलनास्थळी जमा झाल्याने दिल्ली गेट परिसरात ट्राफिक पूर्णपणे जाम झाली आहे. तर घटनास्थळी खुद्द पोलीस आयुक्त दाखल झाले आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यासाठी खास पगडी
मलिकांची याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळली
राज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?
‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’
जालन्यातील मामा चौक येथे ऑल इंडिया ईमाम कौन्सिलच्या वतीने नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी मुस्लिम बांधवांनी भाजप तसेच नुपूर शर्मा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली आहे.