अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा शकील याचा मुंबईतील व्यवहार संभाळणारा आरिफ अबूबकर शेख उर्फ आरिफ भाईजान याची मिरा रोड येथील घर राष्ट्रीय तपास संस्थेकडून जप्त करण्यात आले आहे.आरिफ भाईजान आणि त्याच्या एका नातेवाईकाला फेब्रुवारी २०२२मध्ये एनआयए ने अटक केली होती,सध्या आरिफ भाईजान हा तुरुंगात आहे.
आरिफ भाईजान हा कुख्यात गुन्हेगार छोटा शकील याचा मुंबईतील सर्व व्यवहार हाताळत होता, तसेच दहशतवादी कृत्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप आरिफ भाईजान याच्यावर आहे.२०२२मध्ये आरिफ भाईजान आणि त्याचा नातेवाईक शब्बीर अबुबकर शेख (५१) या दोघांना दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्याना आर्थिक पुरवठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी
विरोधकांच्या बैठकीत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी
कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी
पाकिस्तानी सीमा हैदर उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याची टोळी शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट नोटा प्रसारित करणे आणि अनधिकृत मालमत्ता बाळगणे यात गुंतली आहे, या बेकायदेशीर धंद्यातून येणारा पैसा दहशतवादी निधी उभारण्यासाठी आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना पुरवत असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) तपास करीत असून या प्रकरणी दाऊद इब्राहिम, त्याचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयए ने मुंबईतून छोटा शकीलचे सर्व व्यवहार सांभाळणारा आरिफ अबूबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा नातलग शब्बीर यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान एनआयए सोमवारी आरिफ भाईजान याचे मीरा रोड येथील गौरव ग्रीन रो हाऊस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी मधील घर जप्त केले आहे. भाईजान याने ही संपत्ती बेकायदेशीररित्या कमावलेल्या पैशातुन खरेदी केली असल्याची एनआयए ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.