अलीगढ मुस्लिम विद्यापीठात हिंदूंच्या पौराणिक कथांमधील काही संदर्भ घेऊन त्यातून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. न्यायवैद्यकीय विभागात बलात्कार या विषयावर या प्राध्यापकाने हे कृत्य केले होते.
हे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र कुमार यांनी धार्मिक भावना दुखावल्या. यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.
कुमार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. वर्गात आपल्या लेक्चरदरम्यान अवमानजनक विषयांचे सादरीकरण या प्राध्यापकाने केले.
याबाबत पोलिस अधिकारी श्वेताभ पांडे यांनी म्हटले आहे की, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. जितेंद्र कुमार यांनी आक्षेपार्ह विषयाबाबत पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन केले. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यासंदर्भात डॉ. नीशेश शर्मा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे जितेंद्र कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र कुमार यांनी याबाबत बिनशर्त माफीही मागितली आहे.
विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रारी दाखल केल्या तसेच त्या लेक्चरमधील ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे फोटोही विद्यार्थ्यांनी दिले. याबाबत कॉलेजच्या प्रसिद्धीप्रमुख शफी किडवाई म्हणाले की, प्राथमिक चौकशी केल्यानंतर आम्ही जितेंद्र कुमार यांना निलंबित केले आहे. आता त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
हे ही वाचा:
यशवंत जाधव यांच्याभोवतीचा फास आवळला; प्रधान डीलर्स संचालकांविरोधात तक्रार
हिजाब वाद पेटवायला अल कायदाचे तेल?
संजय राऊत यांच्यासाठी शरद पवार भेटले नरेंद्र मोदींना
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी बलात्कार या विषयावर न्यायवैद्यक विभागातर्फे लेक्चर होते. त्यात हिंदू देवीदेवतांच्या नावांचा, पौराणिक कथांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेपही घेतला.
यासंदर्भात आता दोन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत, याविषयीही सूचना या समितीने कराव्यात असे सांगण्यात आले आहे.