गाडीखाली चिरडलेली तरुणी म्हणते, ‘मी प्रेमात होते, तो विवाहित असल्याचे माहीत नव्हते’

आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा असणाऱ्या अश्वजीत गायकवाडवर मुलीचे आरोप

गाडीखाली चिरडलेली तरुणी म्हणते, ‘मी प्रेमात होते, तो विवाहित असल्याचे माहीत नव्हते’

महाराष्ट्र सरकारमधील एका आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा असणाऱ्या अश्वजीत गायकवाड याने एका महिलेच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. प्रिया असे या महिलेचे नाव असून तिचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि तो विवाहित असल्याचे तिला माहीत नसल्याचे सांगितले आहे.

‘आम्ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. मला आधी माहीत नव्हते की तो विवाहित आहे,’ असे २६ वर्षीय प्रिया सिंह हिने स्पष्ट केले. ११ डिसेंबर रोजी अश्वजीत याने ठाण्यातील एका हॉटेलबाहेर प्रियाच्या अंगावर गाडी घातली होती. आरोपी अश्वजीत गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे. अश्वजीतच्या ‘एक्स’वरील प्रोफाइलनुसार तो भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या ठाणे विभागाचा अध्यक्ष आहे.

 

‘जेव्हा मला समजले की, अश्वजीत विवाहित आहे, तेव्हा मला त्याने तो आणि पत्नी आता एकत्र राहात नसल्याचे आणि विभक्त झाल्याचे सांगितले होते. माझ्याशी लग्न करणार असल्याचे त्याने मला सांगितले होते. आम्ही दीर्घकाळापासून एकत्र राहात आहोत,’ असे प्रियाने सांगितले. ‘त्या रात्री जेव्हा मी त्याला भेटायला गेले, तेव्हा तो त्याच्या पत्नीसोबत होता. हे पाहून मला धक्का बसला आणि मी त्याच्याशी बोलायला गेले. तेव्हा तो संतापला आणि आमचे भांडण झाले,’ असे प्रियाने सांगितले.

प्रियाने यावेळी तिच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली. ‘माझ्या उजव्या पायाची तीन हाडे मोडली आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. खांद्यापासून कंबरेपर्यंत मला दुखापत झाली आहे. मी कोणतीही हालचाल करू शकत नाही,’ असे प्रियाने सांगितले. ‘चार दिवसांपूर्वी जेव्हा मी याबाबतचा एफआयआर दाखल करण्यासाठी गेले, तेव्हा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र आज जेव्हा मी सोशल मीडियावर पोस्ट केली तेव्हा पोलिस माझ्या मदतीला धावून आले,’ असेही प्रियाने सांगितले.

हे ही वाचा:

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाआधी वॉशिंग्टनमध्ये उत्साहाची लाट

बिहारच्या दानापूर गावात पुजाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या!

पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डीनल अन्जेलो बेक्यूना तुरुंगवासाची शिक्षा

नागपूर; सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू!

‘मी प्रियाची सकाळी भेट घेतली. तिची प्रकृती आता स्थिर असली तरी जखमा गंभीर आहेत. या जखमांच्या स्वरूपानुसार, आरोपीवर कलम ३०७ लावणे गरजेचे आहे. ते लावण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही तपास अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना कलम ३०७ आणि ३५६ लावण्याची विनंती केली आहे. मात्र आतापर्यंत तरी त्यांनी याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. याला चार दिवस उलटून गेले आहेत. याबाबत त्यांनी तातडीने कारवाई न केल्यास आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ,’ असे प्रियाच्या वकील दर्शना पवार यांनी सांगितले.

 

प्रिया ज्या दिवशी अश्वजीतला भेटायला गेली, तेव्हा त्यांच्यात जोरदार भांडण झाले. अश्वजीतने तिला मारहाण केली आणि तिला जमिनीवर पाडले. तसेच, ड्रायव्हरला तिच्या अंगावर गाडी घालण्यास सांगितले, अशी तक्रार प्रियाने केली आहे. अश्वजीतने मात्र तिने केलेले सर्व आरोप फेटाळले असून हा सर्व खंडणी उकळण्याचा प्रकार आहे, असा दावा केला आहे.

Exit mobile version