जामीन होऊन देखील घरचे जामीन करीत नाहीत किंवा तुरुंगात भेटायला येत नाहीत म्हणून नैराश्य आलेल्या एका कच्च्या कैद्याने आर्थर रोड तुरुंगातील बॅरेक मधील बाथरूम मध्ये गळफास लाऊम आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली आहे.
मोहम्मद हनीफ इक्बाल शेख असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग या ठिकाणी राहणारा मोहम्मद याला काही महिन्यांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आर्थर रोड तुरुंगात दररोज सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे कैदी आणि आरोपींची हजेरी घेतली जाते. गुरूवारी सकाळी हजेरी दरम्यान हनीफ हा गैरहजर असल्याचे दिसून आले.
तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी तुरुंगाच्या आवारात त्याचा शोध घेतला असता बाथरूम बऱ्याच वेळापासून आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे आतील पाण्याचा नळही सुरु होता. अनेकदा आवाज देऊनही आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने तुरुंग प्रशासनाने दरवाजा तोडला. आतमध्ये बाथरूमच्या छताला आतील बाजूने हनीफ हा लटकलेल्या स्थितीत आढळला.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेश निवडणुकीतील ‘M’ फॅक्टर
बनारस हिंदू विद्यापीठात हिंदू धर्माच्या अभ्यासक्रमाचे वर्ग
‘राणीच्या बागेत दुर्मिळ प्राण्यांच्या नावाने १०६ कोटींचा घोटाळा’
वैद्यकीय अभ्यासक्रमात २७ टक्के ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ पाठिंबा
तुरुंग प्रशासनाने याबाबत कळवताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. हनीफ याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मोहम्मद हनिफ याला अमली पदार्थचे व्यसन होते, त्यात त्याला घरचे तुरुंगात भेटायला येत नव्हते. तसेच जामीन होऊन देखील घरचे त्याला तुरुंगातुन बाहेर काढत नाही म्हणून नैराश्यापोटी त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.