मुलाखतीत फोनवर बोलू दिले नाही, म्हणून एका कैद्याने तुरुंग रक्षकाला मारहाण केल्याची घटना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात घडली. याप्रकरणी या कैद्याविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रावण जनार्धन चव्हाण उर्फ आवान असे या कैद्याचे नाव आहे. श्रावण याला एका गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून त्याची रवानगी सध्या आर्थर रोड तुरुंगातील सर्कल क्रमांक ११ मध्ये करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी दुपारी श्रावण याची मुलाखतीसाठीची वेळ होती, त्याला भेटण्यासाठी त्याचे नातलग आले होते. मुलाखत कक्षातुन तो नातलगांसोबत फोन वर बोलत होता. मात्र त्याची मुलाखतीची वेळ संपली तरी तो फोन बंद करीत नसल्यामुळे तुरुंग रक्षकाने त्याला तुझी वेळ संपली आहे, दुसऱ्या कैद्याला मुलाखत घेऊ दे असे सांगितले. परंतु श्रावण हा मुलाखत कक्षातून बाहेर येत नसल्याचे बघून तुरुंग रक्षकाने त्याचा फोन बंद केला.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
९.४५ कोटींची संपत्ती असणारे चन्नी गरीब?
महाभारत मालिकेतील ‘भीम’ प्रविणकुमार यांचे निधन
फोन बंद केल्याचा राग आल्यामुळे रागाच्या भरात श्रावण याने तुरुंग रक्षक अनिल जाधव यांना शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी अन्य तुरुंग रक्षकाने मध्यस्थी करून श्रावण याला दूर करून त्याच्या तावडीतून अनिल जाधव यांची सुटका केली. याप्रकरणी तुरुंग रक्षक यांनी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.