इम्रानच्या घराबाहेर पोलिस छाप्याच्या तयारीत !

३०- ४० दंगलीतील संशयित पोलिसांच्या हवाली करण्याची मुदत संपल्याने पोलिस घरावर छापा घालण्याच्या तयारीत

इम्रानच्या घराबाहेर पोलिस छाप्याच्या तयारीत !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर देशभरात जाळपोळ, लुटालूट करणाऱ्या दंगलखोरांपैकी काहींनी इम्रान यांच्या घरी आश्रय घेतल्याचा आरोप पाकिस्तानी पोलिसांनी केला होता. त्यांना शरण येण्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने आता इम्रान यांच्या घराबाहेर वेढा घातलेले पोलिस त्यांच्या घरावर छापा घालण्याच्या तयारीत आहेत. यासाठी वरिष्ठ पातळीवरून आदेश येण्याची ते वाट पाहात आहेत.इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलकांनी हिंसक निदर्शने केली होती.

इम्रान यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यात आणि सुरक्षा दलांमध्ये पुन्हा चकमकी होण्याची भीती निर्माण झाली आहे. इम्रान यांनी पाकिस्तानचा सत्ताधारी पक्ष त्यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही. ‘त्यांना मला अटक करायची आहे. मला संपवायचे आहे आणि पीटीआयवर बंदी घालायची आहे. पीटीआयला संपवण्याचे प्रयत्न आता एक वर्षाहून अधिक काळ सुरू आहेत,” असे इम्रान यांनी लाहोरमधील त्यांच्या जमान पार्क निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. या निवासस्थानाला सध्या पंजाब पोलिसांनी गराडा घातला आहे.

हे ही वाचा:

वाघ, वाजे, वज्रमुठीवरू न फडणवीसांची टोलेबाजी

उद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..

रफाएल नदाल पुढील वर्षी करणार टेनिसला अलविदा

त्या २६ मुलींचे आयुष्य ‘द केरळ स्टोरी’सारखेच

इम्रान खान यांची गेल्या आठवड्यात कोठडीतून सुटका करण्यात आल्यानंतर ते त्यांच्या घरी परतले आहेत. त्यांच्या घराबाहेर त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकांसह त्यांचे समर्थकही तेथेच थांबले आहेत. पोलिसांनी बुधवारी निवासस्थानाला वेढा घातला. तसेच, ९ मेच्या दंगलीत सामील असलेल्या ४० संशयितांना ताब्यात घ्यायचे आहे, असे सांगत त्यांनी इम्रान यांना गुरुवारपर्यंतची मुदत दिली. ही मुदत तेथील स्थानिक वेळेनुसार, गुरुवारी दुपारी दोन वाजता संपली. मात्र अटक करण्याच्या दिशेने पोलिसांच्या कोणत्याही हालचाली दिसल्या नाहीत.

‘अधिकारी छापा टाकण्यासाठी सरकारच्या संकेतांची वाट पाहत होते’, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी हसन जावेद यांनी सांगितले. तर, जवळच्या कालव्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान आठ संशयितांना पोलिसांनी पकडले आहे. खान यांनी समर्थकांना संबोधित करताना ‘पोलिस केवळ ‘सर्च वॉरंट’ असेल तरच त्यांच्या घराची झडती घेऊ शकतात, असे म्हटले आहे. तसेच, ‘अराजकता निर्माण करून आत घुसू नका. देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष पीटीआयवर हल्ला चढवण्याचे हे निमित्त बनवू नका,’ असा इशारा इम्रान यांनी पाकिस्तानचे सत्ताधारी आणि लष्कराला दिला आहे. तर, पंजाब सरकारचे प्रवक्ते अमीर मीर यांनी हल्ला झाल्यास पोलिस बंदुकीचा वापर करण्यास सज्ज आहेत, असा इशारा दिला आहे.

Exit mobile version