देवरियातील फतेहपूर नरसंहारातील आरोपींविरोधात आता बुलडोझर कारवाईची तयारी सुरू आहे. प्रेमचंद यादवसह अन्य आरोपींच्या घरांची तसेच, आसपासच्या जमिनीची तपासणी सरकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. यात प्रेमचंदच्या नव्या घराचा काही भाग धान्यकोठाराच्या जागेवर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या घरावर बुलडोझर फिरवण्यात येऊ शकतो.
आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या सहा पथकांकडून संपूर्ण रात्रभर छापासत्र सुरू होते. या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणांवरून १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सकाळी बीआरडी मेडिकल कॉलेजला येऊन अनमोलच्या आरोग्याची विचारपूस केली आणि त्याच्या उपचारांत कोणतीही हलगर्जी होता कामा नये, असे निर्देश दिले.
सोमवारी सकाळी फतेहपूर येथे जमिनीच्या वादातून माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रेमचंदच्या नातेवाइकांनी जमावासोबत येऊन सत्यप्रकाश दुबे, त्याची पत्नी, दोन मुली आणि दोन मुलांची हत्या केली होती. यात अनमोलही मारला गेला असा समज झाला होता, मात्र त्याचा श्वासोच्छवास सुरू होता.
हे ही वाचा:
आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!
बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी
ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रधान गृहसचिव संजय प्रसाद आणि स्पेशल डीजी प्रशांत कुमार यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर कारवाईने वेग पकडला. संपूर्ण रात्र पोलिसांचे छापासत्र सुरू होते. एका रात्रीतच प्रेमचंद यादव याचे वडील रामभवन यादव आणि भाऊ रामजी यादव यांच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तर, प्रेमचंद याच्या हत्येप्रकरणी सत्यप्रकाशसह पाच मृतांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.