कर्नाटकमधील कथित सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी कर्नाटकचे जेडीएस खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकात सेक्स स्कँडल प्रकरण उघड होताच गेल्या अनेक दिवसांपासून प्रज्वल रेवन्ना हे फरार होते. ते परदेशात पळून गेल्याचं बोललं जात होतं.
“मला चुकीचे समजू नका. ३१ तारखेला सकाळी १० वाजता मी एसआयटीसमोर असेन आणि मी सहकार्य करीन. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि माझ्यावरील हे खोटे खटले आहेत. माझा कायद्यावर विश्वास आहे,” असे प्रज्वल रेवन्ना यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले आहे. प्रज्वल रेवन्ना यांनी म्हटलं आहे की, “माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचलं गेलं. त्यामुळे मानसिक तणावाखाली होतो. माझ्याविरोधात काही शक्ती काम करत होती. कारण राजकारणात पुढे चाललो होतो. परदेशात कुठे आहे याची माहिती न दिल्याबद्दल कुटुंबातील सदस्यांची, कुमारन्ना आणि पक्षातील कार्यकर्त्यांची माफी मागतो. २६ तारखेला जेव्हा निवडणूक संपली तोपर्यंत माझ्याविरोधात कुठलाही खटला नव्हता. SIT ही गठीत झाली नव्हती. मी गेल्यानंतर २-३ दिवसांनी युट्यूबवर माझ्यावरील आरोप पाहिले. मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून SIT ला पत्र लिहून ७ दिवसांची मुदत मागितली होती,” अशी माहिती प्रज्वल रेवन्ना यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू!
रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अथवा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!
मुलींची बाजी, कोकण ‘गुणवत्ता यादीत’ अव्वल
अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव
प्रज्वल रेवन्नाला त्यांचे आजोबा देवेगौडांनीही पत्र लिहून इशारा दिला होता. देवेगौडा यांनी प्रज्वल रेवन्ना याला लवकरात लवकर भारतात परतण्याचा इशारा दिला. देवेगौडांनी एक्सवर पोस्ट करून लिहिलं होतं की, “मी प्रज्वल रेवन्ना याला इशारा देतो, तो जिथे कुठे असेल, तिथून त्याने लवकरात लवकर भारतात परत यावे आणि येथील कायदेशीर प्रक्रिया सामोरे जावे. त्याने माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये.”