प्रदीप शर्मासह दोघांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

प्रदीप शर्मासह दोघांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले चकमक फेम पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता १२ जुलैपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात येईल. त्याआधी, शर्मा यांचे वकील पासबोला यांनी कोर्टापुढे अर्ज सादर करत आपल्या अशीलाला विशेष कारागृहात पाठवण्याची मागणी केली. ठाणे तुरुंगात आपल्याला ठेवण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. पण न्यायालयाने तळोजा कारागृहातील प्रशासनानं या अर्जाची योग्य ती दखल घ्यावी, अस कोर्टाने म्हटलं आहे. त्यानुसार प्रदीप शर्मा यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मनसुखच्या हत्येत मनीष सोनी आणि सतीश मोटकर यांचा जास्त सहभाग आहे. मनीष हत्येत वापरलेली गाडी चालवत होता. दोन्ही आरोपी हे या हत्या प्रकरणात महत्त्वाचे दुवे मानले जातात. या प्रकरणात प्रचंड पैसा विविध माध्यमातून जमा करण्यात आला. नंतर या दोघांनी परदेशात प्रवास केल्याचेही काही धागेदोरे मिळाले आहेत, त्याची चौकशी करण्यासाठी या दोघांची कोठडी वाढवावी अशी मागणी एनआयएने केली. एनआयएने मनीष सोनी आणि सतीश मोटकरी यांचा रिमांड मात्र मागितला, तेव्हा या दोघांनाही १ जुलैपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भारताने लसीकरणात अमेरिकेलाही टाकले मागे

परमबीर सिंग दोन महिने सुट्टीवर

भारताने केली अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

स्वप्नातल्या घरासाठी सामन्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पी.एस. फाउंडेशन या संस्थेच्या अंधेरी पूर्व येथील कार्यालवर एनआयएकडून छापेमारी करण्यात आली होती. यापूर्वी देखील एनआयए कडून या संस्थेच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्यावेळी एनआयए कडून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले होती.

एनआयएने याआधी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, सुनील माने यांना अटक केली होती. त्याशिवाय, एनआयएने माजी पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांनाही अटक केली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार वाझेला हिरेन प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी शर्मा यांनी मदत केली होती. शिवाय, कट रचणे आणि त्याचे नियोजन करण्यातही शर्मा यांची महत्त्वाची भूमिका होती.

Exit mobile version