मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका ३० वर्षीय व्यक्तीने आपण महाविद्यालयीन शिक्षिका असल्याचे दाखवून तसेच, त्यांना शिष्यवृत्ती निधीच्या संदर्भात बोलावून किमान सात मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. या सर्व विद्यार्थिनी बहुतांश आदिवासी जमातीच्या आहेत.
ब्रजेश प्रजापती या आरोपीने या विद्यार्थिनींशी फोनवर बोलत असताना आवाज बदलणारे ॲप वापरून महिलेसारखा आवाज केला होता, असे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश दिले असून या व्यक्तीला अटक केल्यानंतर आरोपीचे अनधिकृत घर पाडण्यात आले.
प्रजापतीच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती रीवा रेंजचे महानिरीक्षक (आयजी) महेंद्रसिंग सिकरवार यांनी दिली.
प्रजापतीने टिकारी येथील एका महाविद्यालयात शिक्षिका असल्याचे भासवून विद्यार्थिनींना बोलावले आणि शिष्यवृत्ती मिळावी म्हणून त्यांना भेटण्यास सांगितले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. फोनवरून प्रजापतीने ‘तिचा मुलगा’ त्यांना तिच्या घरी घेऊन जाईल, असे मुलींना सांगितले होते. गुन्हा केल्यानंतर तो तरुणीचा मोबाईल हिसकावून घेत असे. तक्रारकर्त्यांपैकी एकीने सांगितल्यानुसार, अशाच एका संभाषणानंतर, प्रजापतीने स्वत: हेल्मेट आणि हातमोजे घालून तिला मोटारसायकलवरून उचलून एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
गुन्हेगाराच्या हातावर भाजलेल्या आणि जखमांच्या खुणा असल्याचे तपासादरम्यान पोलिसांना समजल्यानंतर त्याला पकडण्यात आले. प्रजापतीने सात मुलींवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे, तर चार मुली तक्रारी देण्यासाठी पुढे आल्या आहेत, असे सिकरवार यांनी सांगितले. त्याने आणखी मुलींवर बलात्कार केला असावा आणि त्याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याचे साथीदार लवकुश प्रजापती, राहुल प्रजापती आणि संदीप प्रजापती यांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एक महाविद्यालयीन विद्यार्थी होता आणि महाविद्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून त्यांना मुलींचे नंबर मिळाले होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुन्ह्यांमध्ये त्याची नेमकी भूमिका काय होती, हे अद्याप समजू शकलेले नाही.
हे ही वाचा:
सराफा व्यावसायिकांवर छाप्यात २६ कोटींची रोकड, ९० कोटींचे बेहिशेबी दस्तावेज जप्त!
राजकोट गेमिंग झोनमध्ये अग्नितांडवात २८ मृत्यू, अग्निशमन विभागाची परवानगी नव्हती
ईव्हीएमवर भाजपचा टॅग असल्याचा तृणमूलचा दावा फुसका!
दिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग, ७ बालकांचा मृत्यू!
१३ मे रोजी ही घटना घडल्यानंतर १६ मे रोजी बलात्कार, अपहरण, प्राणघातक हल्ला आणि दरोड्याचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. ४ मे आणि २० मे रोजी घडलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १८ आणि २३ मे रोजी आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. १५ एप्रिल रोजी घडलेल्या एका गुन्ह्याबद्दल १९ मे रोजी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यादव यांच्या निर्देशांनंतर, पोलिस महानिरीक्षक सिकरवार यांनी कुस्मीच्या पोलिस उपविभागीय अधिकारी (एसडीओपी) रोशनी सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्यीय एसआयटी स्थापन केली असून हे पथक सात दिवसांत आपला अहवाल सादर करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘अशी निंदनीय कृत्ये करणारे हे समाजाचे शत्रू आहेत, आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर लिहिले.
काँग्रेस नेते कमलनाथ यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. ‘मध्य प्रदेशातील आदिवासी समाजातील मुली बिनधास्तपणे कॉलेजमध्ये शिकू शकत नाहीत का?…. बेटी पढाओ, बेटी बचाओ या घोषणेचा अर्थ काय?,’ असा प्रश्न या माजी मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर विचारला आहे. आदिवासी आणि महिलांवरील गुन्ह्यांच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात आघाडीवर आहे, अशीही नोंद त्यांनी केली.
‘मध्य प्रदेशात आदिवासींवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत नाहीत, असा एकही दिवस जात नाही,’ असे ते म्हणाले.
अटकेनंतर जिल्ह्यातील पनवार गावातील प्रजापती यांचे घर फोडण्यात आले आहे. हे घर परवानगीशिवाय सरकारी जमिनीवर बांधण्यात आले होते, असे एका जिल्हा अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले.