महिला वसतिगृहात ‘रक्षकच झाले भक्षक’
जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.
हे ही वाचा:
जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती घेतली. त्यावर त्यांना असं कळलं की, एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले होते.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या विषयावर ट्विट करून ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. “पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, जळगांव महिला वसतिगृहात धक्कादायक घटना. महा विकास आघाडी सरकारच्या राज्यात महिलांची अब्रू सुरक्षित नाही. मोगलाई सुरू असल्याची जनतेची खात्री पटली आहे.” अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
बीडमधील मुलींच्या वसतिगृहातील आयसोलेशन सेंटरमध्ये धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या वसतिगृहातील मुलींच्या कपड्यावर अश्लील लिखाण करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात महिला सुरक्षा हा विषय मंत्र्यांच्या प्रकरणांमुळे चर्चेचा झालाच आहे. परंतु आता या प्रकारांमुळे महिला सुरक्षा या विषयाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.