सराफा व्यावसायिक भरत जैन यांचा मृतदेह २० ऑगस्टला कळवा येथील रेतीबंदर खाडीमध्ये सापडला होता. जैन यांच्या हत्याकांडाप्रकरणात नौपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपींमध्ये एक आरोपी हा जैन यांच्या ओळखीचा आहे. आरोपींनी जैन यांची कॅबमध्ये हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकल्याची माहिती पोलीस चौकशी दरम्यान समोर आली आहे.
भरत जैन हे १४ ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्यांचे अपहरण झाले असावे या शंकेने त्यांच्या पत्नीने नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु २० ऑगस्टला त्यांचा मृतदेह खाडीत सापडल्याने तपासाला वेग आला. सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने पोलिसांनी घणसोलीमध्ये राहत असलेल्या एका कॅब चालकाला ताब्यात घेतले. चालकाकडे चौकशीतून जैन यांच्या हत्याकांडाबद्द्ल पोलिसांना माहिती मिळाली.
हे ही वाचा:
महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान
काबुल विमानतळावर चेंगराचेरीत जिवीत हानी
ठाकरे सरकार हे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे
पुढील तपासादरम्यान पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्यातील एक आरोपी कॅबमालक असून दुसऱ्या एका आरोपीने अन्य तीन आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फरार आरोपी महाराष्ट्राबाहेर असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
भरत जैन यांना कॅबमधून साकेत येथील पुलाखाली घेऊन गेले. कॅबमध्येच मारहाण करून मुख्य आरोपीने त्यांचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर २.३० वाजता जैन यांचा मृतदेह रेतीबंदर खाडीमध्ये फेकून दिला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. आरोपींकडे जैन यांच्या दुकानाची चावी असल्यामुळे त्यांनी दुकानातून चांदीचे दागिने चोरले. तिजोरीची चावी नसल्यामुळे ती उघडता आली नाही. पोलीस पथके फरारी आरोपींच्या मागावर असून लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल. .