औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तोंडोळी येथील घटनेचा औरंगाबाद पोलीस पथकाकडून कसून तपास करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी या घटनेतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले होते. आता शनिवारी (२३ ऑक्टोबर) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेषांतर करुन अमहदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे दुसऱ्या एका आरोपीला अटक केली आहेत. विजय प्रल्हाद जाधव (३८) असे या आरोपीचे नाव आहे.
तोंडोळी येथे शेत वस्तींवर दरोडा टाकणाऱ्या आणि सामुहिक बलात्कार करणाऱ्या टोळीचा शोध चार जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी घेत होते. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना या टोळीचा म्होरक्या आणि मुख्य आरोपी प्रभू श्यामराव पवार याला बेड्या ठोकण्यात यश मिळाले. आरोपीच्या कबुलीनंतर टोळीतील इतर सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. दुसरा आरोपी विजय जाधव हा कोपरगाव येथील सासुरवाडीत लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्याठिकाणी ऊसतोड मजूर म्हणून चौकशी केली आणि आरोपीची खात्री मिळाल्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, अंमलदार वाल्मीक निकम, रावेश्वर धापसे आणि संजय तांदळे यांनी केली.
हे ही वाचा:
इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट
मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!
३४ मतदारांच्या निवडणुकीत आज शरद पवार-धनंजय शिंदे लढत
इस्लामचा त्याग करून इंडोनेशियाच्या राजपुत्री करणार हिंदुधर्मात प्रवेश! वाचा सविस्तर…
तोंडोळी घटनेतील सर्वच आरोपींची ओळख पटली असून सात आरोपींपैकी दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. उर्वरीत पाच जण अद्यापही फरार आहेत. यातील एकही आरोपी मोबाइल वापरत नसल्यामुळे लोकेशन मिळवण्यात अडचणी येत आहेत. मात्र लवकरच सर्व आरोपी पकडले जातील, असे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील शेत वस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी मध्यरात्री कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांचे हातपाय बांधून ठवले. त्यानंतर महिलांवर सामूहिक अत्याचार केला. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख ३६ हजार आणि बनावट दागिने लंपास केले.
तोंडोळी दरोड्यात दरोडेखोरांनी ज्या दोन महिलांवर बलात्कार केला, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.