कांदिवलीतील एक अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार कुटुंबाने नोंदवल्यावर मुलीचा शोध घेण्यात समतानगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश आले आहे. हैदराबादमधून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे.
कांदिवलीतील लोखंडवाला परिसरात ही १६ वर्षांची मुलगी राहते. सध्या ही मुलगी बारावीत शिकत आहे. तिला मॉडेलिंगची आवड होती. तिच्या मॉडेलिंगच्या आवडीबद्दल तिने पालकांना सांगितले होते. मात्र तिच्या वडिलांना तिचे मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणे पसंत नव्हते. त्यामुळे मुलीमध्ये आणि वडिलांमध्ये या विषयावरून वाद झाला. त्यानंतर शनिवारी मुलीने नातेवाईकांच्या घरी पूजेला जात असल्याचे सांगून ती घरातून निघून गेली.
हे ही वाचा:
‘या’ लोकसभा खासदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल
सहा जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांना मिळाला मुहूर्त; ५ ऑक्टोबरला मतदान
नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे ते करत होते बेकायदेशीर ‘पीडीएफ’
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जमिनीवरच अनधिकृत बांधकामे
नातेवाईकांकडे गेलेली मुलगी रात्रीपर्यंत घरी आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही तेव्हा त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान ती हैदराबाद येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांच्या पथकाने तिला हैद्राबाद येथून ताब्यात घेतले आणि तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
शनिवारी ही मुलगी कुर्ला येथून वाडीला गेली होती. रात्री तिने तिथल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले. तिथे तिला एकटीला भीती वाटली आणि भीतीपोटी मुलीने तिथून तिच्या एका नातेवाईकाला फोन केला होता. तिथून ती हैदराबादला निघून गेली.