१९९३ मधील मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या कबरीला लायटिंग आणि संगमरवरी फरशी बसवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सर्व स्तरांवरून प्रश्न उपस्थित होताच आणि टीका होताच या कबरीवरील एलईडी लाईट्स मुंबई पोलिसांनी काढून टाकल्या आहेत.
मुंबईमध्ये १९९३ मध्ये साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. या प्रकरणातील आरोपी याकुब मेमन याला २०१५ साली फाशी देण्यात आली होती. त्यानंतर याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. आता याकुब मेमन याच्या कबरीला लायटिंग आणि संगमरवरी फरशी बसवल्याचे फोटो समोर आले आहेत.
हे प्रकरण प्रकाशझोतात येताच पोलिसांनी कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत. मुंबई महापालिकेचे एक पथकही कब्रस्तानमध्ये जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बडा कब्रस्तानचे अध्यक्ष शोएब खातीब यांनी सांगितले की, “कबरीवर कुठलेली लायटिंग केलेलं नाही. अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही. समोर आलेले व्हिडीओ जुने असण्याची शक्यता आहे. शब-ए-बारातला संपूर्ण दफनभूमीला रोषणाई करण्यात येते. त्यामुळे याकुबच्या कबरीवरील रोषणाईचा फोटो जुना असू शकतो,” अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
कब्रस्तानमधील दफन केलेल्या मृतदेहाची जागा ही १८ महिन्यानंतर खोदण्यात येते. मात्र, आता पाच वर्षे झाल्यानंतरही याकुब मेमनची कबर का खोदली गेली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच याकुबच्या कबरीवर इतका खर्च कोण करत आहे? हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
हे ही वाचा:
शिर्डीमध्ये रेड अलर्ट, अहमदनगरमध्ये कलम १४४ लागू
“पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि आम्ही धनुष्यबाण जिंकू”
निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण झाले. हेच उद्धव ठाकरेंचे मुंबईवरचे प्रेम आहे का?” असे संतप्त सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी विचारले आहेत.