बिहारमधील किशनगंजमधील टेढागाछ पोलिस ठाण्याचा प्रमुख नीरजकुमार निराला याने पोलिस ठाण्याच्या आवारातच विवाहित महिलेला कैद करून तिच्यावर आठ दिवस बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. पोलिस अधिक्षकांनी यावर तत्काळ कारवाई करून या पोलिसाला निलंबित करून अटकेचे आदेश दिले आहेत.
निराला हा मधेपूरचा मूळ रहिवासी असून पाच वर्षांपासून तो किशनगंज जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्याची नेमणूक टेढागाछ येथे झाली होती. तर, आरोप करणाऱ्या महिलेचे माहेर उत्तर प्रदेशातील आंबेडकर जिल्ह्यामधील बालापूर आहे. ती काही दिवसांपूर्वी ट्रेनने बिहारमध्ये आली होती. पोलिस ठाण्याचा प्रमुख आणि डाकपोखर गावाचे सरपंच मनोज यादव यांनी तिच्यावर पोलिस ठाण्यातच थांबण्यासाठी दबाव आणला, असा आरोप पीडित महिलेने केल्यामुळे या प्रकरणी यादव याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तात्काळ कारवाई करताना पोलिस अधीक्षक डॉ. इनामूल हक मेंगनू यांनी नीरजकुमार निराला याला निलंबित करून अटक करण्याचे आदेश दिले. त्याच्यावर विभागीय कारवाईही सुरू करण्यात आली आहे. मात्र आता हा पोलिस फरार झाला आहे.
हे ही वाचा:
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायला जातानाच झाला अपघात
मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले
मोफत तिकीट द्या, वीज द्या…कर्नाटकवासी काँग्रेस सरकारच्या लागले मागे
किरकोळ शरीरयष्टीचा चोर गज वाकवून कोठडीतून पळाला!
दोन लाख रुपये घेऊन मुक्तता
उत्तर प्रदेशातील ही महिला एक महिन्यापूर्वी आपल्या नवऱ्याचा ठावठिकाणा शोधावा, यासाठी पोलिस ठाण्यात आली होती. पोलिस ठाण्याचा प्रमुख नीरजकुमार याच्याकडे तिने याबाबत तक्रार दाखल केली. नीरजकुमारने सरपंच मनोज यादवला बोलावले. त्यानंतर नीरजकुमारने तिच्यावर आठ दिवस बलात्कार केला. त्यानंतर महिलेच्या पतीला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि पोलिस व सरपंचांनी महिलेकडून दोन लाख रुपये उकळून त्यांची सुटका केली. त्यानंतर महिलेला ट्रेनमध्ये बसवून उत्तर प्रदेशात पाठवून देण्यात आले. तेव्हा तिने ही बाब सासरच्या मंडळींना सांगितली नव्हती. मात्र एक आठवड्यापूर्वी पुन्हा ती टेढागाछमध्ये आल्यानंतर तिने हा प्रकार सर्वांना सांगितला.