चेतन सिंहच्या मानसिक विकाराच्या दाव्यावर पोलिसांना संशय

चेतन सिंहच्या वकिलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मात्र तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा केला दावा

चेतन सिंहच्या मानसिक विकाराच्या दाव्यावर पोलिसांना संशय

धावत्या जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन प्रवाशांना ठार मारणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाचा कॉन्स्टेबल चेतन सिंह हा मानसिक आरोग्याने ग्रस्त असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र पोलिसांनी या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. हा खटला कमकुवत करून स्वत:ला वाचवण्याचा चेतन सिंहचा प्रयत्न आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे.

आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने चौघांना गोळ्या घालून ठार केले, तेव्हा तो व्यवस्थित शुद्धीवर होता, असे या घटनेचा तपास करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. कॉन्स्टेबलला मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रासले असल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला.

चेतन सिंहवर मानसिक आरोग्याच्या समस्येवर उपचार सुरू असले तरी त्याचा अर्थ असा नाही की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे त्याने गुन्हा केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी चेतन सिंह गुन्हा केला तेव्हा तो व्यवस्थित शुद्धीवर होता. आरोपीने त्याला जे करायचे होते ते केले. मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती असा गुन्हा करेल यावर माझा विश्वास बसत नाही, असे एका अधिकाऱ्याने नमूद केले. तो तपासात सहकार्य करत नसून शूटिंगशी संबंधित कोणताही प्रश्न विचारला असता तो अधिकाऱ्यांना असंबद्ध उत्तरे देत आहे.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ३७० बाबत कपिल सिब्बल यांची तासमपट्टी

अंदमान बेटांवर बसले भूकंपाचे धक्के

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षणाला हिरवा झेंडा

चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद

चेतन सिंहच्या वकिलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मात्र तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने त्याने हा गुन्हा केल्याचा दावा केला आहे. चेतन सिंहने प्रथम धावत्या ट्रेनमध्ये त्याचे वरिष्ठ अधिकारी टिकाराम मीना यांना गोळ्या घालून ठार मारले आणि नंतर इतर डब्यांमध्ये गेला. तिथे त्याने तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, चेतन सिंहने मारण्यापूर्वी त्यांच्या पीडितांची ओळख पटवली. त्याने गोळी झाडलेले तीनही प्रवासी वेगवेगळ्या डब्यांतील होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनने प्रथम मीना यांची कोच बी ५ वर हत्या केली. त्याच डब्यातील आणखी एका प्रवाशाला त्याने ठार केले. मग तो कोच बी २ मध्ये गेला आणि त्याने त्याचा दुसरा बळी घेतला. त्याला जबरदस्तीने बंदुकीच्या जोरावर दोन डब्यांच्या अंतरावर असलेल्या पॅन्ट्री कारपर्यंत ओढले, जिथे त्याने त्याला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर तो कोच एस ६ मध्ये गेला जिथे त्याने त्याच्या चौथ्या बळीची हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, चेतन हत्या करण्यापूर्वी त्याच्या बळींची ओळख पटवत होता. त्यानंतर साखळी ओढली गेली आणि मीरा रोड आणि दहिसर स्थानकादरम्यान ट्रेन थांबवली. चेतन सिंह ट्रेनमधून खाली उतरला आणि त्याने ट्रेनवर गोळीबार सुरू केला. ट्रेन थांबली नसती तर चेतन सिंहने आणखी लोकांचा बळी घेतला असता, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Exit mobile version