३० वर्षांपूर्वी लोणावळ्यात एका दाम्पत्याची हत्या करून मुंबईत नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. अविनाश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ३० वर्षांपूर्वी त्याचे वय १९ वर्षे होती. विक्रोळीच्या टागोर नगर मध्ये पत्नी आणि मुलासह राहणारा अविनाश पवार हा मुंबईत एका खाजगी वाहनावर वाहन चालक म्हणून नोकरी करीत होता. गुन्हे शाखा कक्ष ९चे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
लोणावळा शहरातील यशोदा बंगला, सत्यम सोसायटी येथे राहणारे दाम्पत्य धनराज कुरवा आणि धनलक्ष्मी कुरवा यांची ४ ऑक्टोबर १९९३ साली हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यानी हत्या केल्यानंतर बंगल्यात लूट करण्यात आली होती.
याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी हत्या आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून अमोल काळे आणि विजय देसाई या मारेकऱ्याना अटक करण्यात आली होती, परंतु मुख्य आरोपी अविनाश पवार हा फरार झाला होता. तो लोणावळा पोलिसांना सापडत नव्हता,. तो विविध ठिकाणी वेगवेगळी नावे परिधान करून स्वतःची ओळख लपवून राहत होता. लोणावळा पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करून देखील आरोपी सापडत नसल्यामुळे लोणावळा पोलिसांनी शोध घेणे थांबवले होते.
हे ही वाचा:
आता नेहरू मेमोरियल नाही; पंतप्रधान मेमोरियल
चक्रीवादळ व्यवस्थापनात ओदिशा ठरलेय ‘रोल मॉडेल’
मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित कॅनडातून ताब्यात
कांदिवलीच्या शाळेत लावली अजान, एक शिक्षिका निलंबित
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९चे प्रभारी पोलिस निरीक्षक दयानंद नायक यांना गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी परिसरात एक इसम मागील अनेक वर्षांपासून नाव बदलून राहत आहे, असे कळले. या माहितीच्या आधारे प्रभारी पोनि. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किरण आहेर, दीपक पवार, सपोनि. उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, स्नेहल पाटील आणि पथकाने सापळा रचून अविनाश पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ३० वर्षांपूर्वी केलेला खुनाचा गुन्ह्याची कबुली दिली.
अविनाश पवार हा नाव बदलून विक्रोळी टागोर नगर येथे पत्नी आणि मुलांसह राहण्यास होता, काही वर्षे गॅरेजमध्ये काम केल्यानंतर त्याने वाहन चालक म्हणून खाजगी वाहनावर नोकरी करीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासासाठी अटक करण्यात आलेल्या आरोपीची ताबा लोणावळा पोलिसांकडे देण्यात येणार आहे.