पुण्यातील पोलिसांनीच लुटले भिवंडीतील व्यावसायिकाचे ४५ लाख

पुण्यातील पोलिसांनीच लुटले भिवंडीतील व्यावसायिकाचे ४५ लाख

पुण्यामधील तीन पोलिसांनीच एका व्यावसायिकाचे ४५ लाख लुटल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भिवंडीत जाऊन एका व्यक्तीच्या साथीने कारवाई करण्याच्या धाकाने स्टिलचा व्यवसाय करणार्‍या औरंगाबाद येथील व्यापार्‍याकडील ४५ लाख रुपये लुटले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश शिंदे, गणेश कांबळे, दिलीप पिलाणे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर बाबूभाई सोलंकी याला अटक केली आहे.

व्यावसायिक रामलाल परमार यांनी या प्रकरणी फिर्याद केली असून अटक करण्यात आलेला आरोपी बाबूभाई सोलंकी हा परमार यांचा मेव्हणा आहे. ही घटना ८ मार्च रोजी सकाळी ६.४५ ते ८ वाजताच्या सुमारास नाशिक-मुंबई हायवेवरील दिवेगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर भिवंडी येथे घडली. रामलाल परमार हे स्टीलचा व्यापार करतात. परमार हे मोठी रोकड घेऊन भिवंडी येथून येणे- जाणे करत असतात, अशी माहिती सोलंकी याने शिंदे, कांबळे, पिलाणे या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. सोलंकी आणि पोलिस कर्मचार्‍यांचा चांगला परिचय आहे. त्यानंतर चौघांनी मिळून परमार यांच्याकडील रोकड लुटण्याची योजना आखली.

सोलंकी याने परमार याची संपूर्ण माहिती अगोदरच पोलिसांना दिली होती. परमार हे ८ मार्च रोजी आपल्या ब्रिझा गाडीमधून नाशिक येथून रोकड घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले असता, नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तिघांनी परमार यांच्या गाडीला गाडी आडवी लावली. यावेळी सोलंकी बरोबर होता. मात्र, तो दुसरीकडे थांबला होता. या पोलिसांनी आम्ही पोलिस आहोत, तुमच्या गाडीत मोठी रोकड आहे. तपास करायचा आहे, अशी बतावणी करून पाच कोटी रोकडमधून ४५ लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेची चित्रीकरणातून २ कोटींची कमाई; हे स्थानक सर्वाधिक पसंतीचे

‘राज्यात नोटीस देण्याची परंपरा नव्हती’ अजित पवारांचा घरचा आहेर

मुंबईकर नव्या आयुक्तांना म्हणतायत ‘थोडा सास तो लेने दो सर’

‘आजचे प्रश्न हे गोपनीय कायद्याचे उल्लंघन मीच केल्यासारखे होते’

त्यानंतर परमार यांनी नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर तपासादरम्यान सोलंकी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता, गणेश शिंदे, गणेश कांबळे व मारुती पिलाणे या तीन पोलिसांच्या साथीने परमार यांना लुटल्याची कबुली त्याने दिली. यानंतर तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली. सोलंकी याला अटक केल्याची माहिती आरोपी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अगोदरच तेथून पळ काढला होता. गुन्हा करून हे तीनही कर्मचारी पुन्हा पुणे येथे कामावर हजर झाले होते. तसेच त्यांनी लुटीमधील पैसे आपापसात वाटून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version