‘पब्जी’ या ऑनलाइन खेळामध्ये एका मुलाने तब्बल १० लाख रुपये गमावले होते. ही बाब आई- वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला चांगलाच दम दिला होता.
आई- वडिलांच्या ओरडण्यामुळे या मुलाने रागाच्या भरात घर सोडले होते. या मुलाचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील दुर्गानगर परिसरात राहत असलेल्या दास दाम्पत्याने २५ ऑगस्टला त्यांचा १६ वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली होती. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखा युनिट- १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक धनराज चौधरी, मुस्कान पथकातील जगदीश धारगळकर आणि दिलीप माने यांनी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा:
रेल्वेच्या ट्रॅकवर त्याने ठेवले दगड !
संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत
२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली
धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव
मुलाच्या स्वभावाबद्दल आणि घरातील त्याच्या संबंधांबद्दल दास दाम्पात्याकडून माहिती घेताना पोलिसांना काही गोष्टी लक्षात आल्या. मुलाला ‘पब्जी’ खेळण्याची सवय होती. यासाठी ‘आयडी’ आणि ‘युसी’ प्राप्त करण्यासाठी त्याने त्याच्या आईच्या बँक खात्यातून ऑनलाइन तब्बल १० लाख रुपये ट्रान्सफर केले. बँकेतून इतक्या रुपयांचा व्यवहार झाल्याचे लक्षात येताच आई- वडील मुलावर संतापले. त्यानंतर डोक्यात राग घालून या मुलाने ‘घरातून निघून जात आहे, परत कधीच येणार नाही’ अशी चिठ्ठी लिहून तो घरातून निघून गेला.
पोलिसांना या चिठ्ठी बद्दल समजताच पोलिसांनी मुलाच्या मित्र- मैत्रिणी आणि काही तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाकडून शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी अंधेरी येथील महाकाली गुंफा परिसरात हा मुलगा एकटाच फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले आणि पुढील कारवाईसाठी त्याचा ताबा एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आला.
बातमी सविस्तर आहे..