राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे अनमोल बिश्नोई टोळीचा हात होता आणि ही हत्या दहशत आणि बिष्णोई टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी करण्यात आली होती असे सोमवारी सत्र न्यायालया
च्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे.
सोमवारी मुंबई गुन्हे शाखेने या हाय-प्रोफाइल प्रकरणात ४५९० पानांचे आरोपपत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केले. गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे (पूर्व) येथील निर्मलनगर पोलीस ठाण्याजवळ सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आरोपपत्रात अटक केलेल्या २६ जणांची नावे आहेत आणि तीन फरार संशयितांची नावे आहेत. मोहम्मद यासीन अख्तर (उर्फ सिकंदर), शुभम रामेश्वर लोणकर (उर्फ शुब्बू), आणि अनमोल लविंदर सिंग बिश्नोई (उर्फ भानू) असे पाहिजे आरोपीची नावे आहेत.
एका संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा प्रमुख सदस्य असलेल्या अनमोल बिष्णोई या हत्येचा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे. अधिका-यांनी पुष्टी केली की टोळीचा प्रभाव मजबूत करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हत्येचा कट रचण्यात आला होता.
हे ही वाचा:
पुण्यात मजार बांधणारे झाले मुजोर, दत्त मंदिराजवळच टाकली चादर!
देशमुखांना मारताना आरोपी आनंद लुटत होते, व्हीडिओ काढत होते!
नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन आयईडी स्फोटाने उडवले
आरोपपत्रात आरोपींची भूमिका, हत्येचा कट, आणि साक्षीदारांचे जबाब, संशयितांना गुन्ह्याच्या ठिकाणी जोडणारे फॉरेन्सिक निष्कर्ष आणि हत्येमध्ये टोळीला गुंतवणारे डिजिटल कम्युनिकेशन रेकॉर्ड यासारख्या विस्तृत पुराव्यांचा समावेश आहे.सुरुवातीला निर्मलनगर पोलिस ठाण्यात नोंद झालेला हा गुन्हा नंतर अधिक सखोल तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. हत्येनंतरच्या काही महिन्यांत, विविध राज्यांमधून २६ संशयितांना अटक करण्यात आली होती, तरीही तीन प्रमुख आरोपी फरार आहेत. जमलेले ठोस पुरावे सिद्दीकीच्या कुटुंबाला आणि समाजाला न्याय मिळवून देतील असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. हे प्रकरण आता विशेष मकोका न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित फरारी आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.