चंदीगडच्या खासगी विद्यापीठातील विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ लीक करणाऱ्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना पंजाबमधील मोहाली येथील खरार येथील न्यायालयात हजर केले आणि दहा दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपांवरून शनिवारी रात्रीपासून पंजाबमधील मोहाली येथील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू आहेत. वसतिगृहात आंघोळ करताना मुलींचा व्हिडिओ बनवून शिमल्यात राहणाऱ्या मित्राला पाठवल्याचा आरोप तरुणीवर आहे. काही विद्यार्थिनींनीही व्हिडिओ लीक झाल्याचा दावा केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे फेटाळून लावले आहेत.
व्हिडिओ बनवल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली. आरोपी विद्यार्थिनीने सांगितले की तिने फक्त तिच्या मित्राला स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, मात्र याचा अजून शोध लागलेला नाही. आरोपी मुलाला रविवारी हिमाचल प्रदेशातून अटक करण्यात आली. याप्रकरणी रविवारी संध्याकाळी हिमाचल प्रदेशातील एका ३१ वर्षीय व्यक्तीलाही अटक करण्यात आली होती. यानंतर दोघांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसांनी तिन्ही आरोपींचे फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त केले आहेत. पंजाब पोलिसांनी सोमवारी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
हे ही वाचा:
अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन
‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’
संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला
भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलम ३५४-सी (पीक-आउट) अंतर्गत या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.