वांद्रे शहरात दिव्यांग भिकाऱ्याने आयत खान या चिमुकलीचे अपहरण केले. या घटनेला १९ डिसेंबर रोजी दोन महिने पूर्ण झाले. वांद्रे पोलीस ठाण्यातील २२ पोलीस कर्मचारी या प्रकरणाची उकल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. १९ ऑक्टोबरपासून त्यांनी दोन वर्षांच्या मुलीचा माग काढण्यासाठी १४ राज्यांतील शहरांना भेटी दिल्याचे समोर आले आहे.
आयतचे पालक सुद्धा भिकारीच आहेत. तीन वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात गुडघ्याखाली पाय गमावलेल्या आसिफ अली शेख (२४) या पश्चिम बंगालच्या मालदाचा रहिवासी आहे. तो त्या मुलीच्या आई-वडिलांशी जवळीक साधून गेल्या एक वर्षापासून तिला भीक मागण्यासाठी सोबत घेऊन जात होता. अपहरणाच्या दिवशी वांद्रे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एकच्या लिफ्टमध्ये असिफ चिमुकली सह सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तेव्हा भीक मागण्यासाठी मुलीला तिच्या आई-वडिलांनी त्याच्या ताब्यात दिले होते.
ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती पोलिसांनी दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त (वांद्रे विभाग) गुणाजी सावंत म्हणाले, “तिच्या पालकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात यश मिळवले. नुकतेच आम्हाला दोन बोगस कॉल आले. अजमेर आणि पाटण येथे पोहोचल्यानंतर आमच्या टीमला ते कॉल बनावट असल्याचे समजले. आम्ही हरवलेल्या मुलीचे पोस्टर, पॅम्प्लेट आणि आरोपीची व्हिडिओ सह क्लिप वितरीत केल्यानंतर आम्हाला हे कॉल येऊ लागले,”.
हे ही वाचा :
‘आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार’
राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका
बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं
घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार
वांद्रे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक राजेश देवरे यांनी सांगितले की, “२२ पोलिस चिमुकलीच्या पालकांसह अजमेर, आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, पाटणा, सुरत, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथे १९ ऑक्टोबरपासून गेले होते. परंतु अजूनही तिचा कुठेच पत्ता लागलेला नाही”. एका पोलिस अधिकाऱ्याने असेही सांगितले की, विविध शहरांमध्ये प्रवास, बोर्डिंग आणि लॉजिंग बिलांसाठी पोलिसांनी स्वतःच्या खिशातून ही योगदान दिले आहे.