घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसाठी तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी मंजुरी दिल्याचे लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कैसर खालिद यांनी या होर्डिंगसाठी २०२१ मध्ये मंजुरी आदेश काढून बेकायदेशीर होर्डिंगला परवानगी दिल्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या अडचणी वाढल्या आहे.
घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्ग येथील समता कॉलनी जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर सोमवारी दुपारी महाकाय होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. हे बेकायदेशीर होर्डिंग ‘लोहमार्ग पोलीस कल्याण निधी ‘साठी देण्यात आलेल्या जागेवर एगो मीडिया या कंपनीने २०२१ मध्ये उभारले होते. या होर्डिंगसाठी मुंबई लोहमार्ग पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी मंजुरी आदेश काढला होता, या आदेशावरून लोहमार्ग पोलिसांनी एगो मीडिया या कंपनीला होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली होती अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी पत्रक काढून दिली आहे.
हे ही वाचा:
एगो मीडिया कंपनीने लोहमार्ग पोलिसांच्या परवानगी नंतर नियमांचे उल्लंघन करून १२० बाय १२० आकाराचे बेकायदेशीर होर्डिंग उभे केले होते. मुंबई महानगर पालिकेने सोमवारी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एगो मीडिया आणि लोहमार्ग पोलिसांनी होर्डिंगसाठी परवानगी किंवा एनओसी देण्यापूर्वी मुंबई महानगर पालिकेकडून कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती, असे पत्रकात नमूद करून मुंबई महानगर पालिकेने या दुर्घटनेतून आपली जबाबदारी झटकून लोहमार्ग पोलिसांवर टाकली आहे.
या दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी एगो कंपनीचे मालक भावेश भिंडे, सर्व संचालक, एगो कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, सिव्हिल कंत्राटदार आणि दुर्घटनेस जबाबदार संबंधित सर्व व्यक्ती यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर एगो कंपनीचे मालक भावेश भिंडे हे फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. पंतनगर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये म्हटले आहे की, होर्डिंगचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून १२० बाय १२० फूट आकाराचे परवानगी नसताना देखील बेकायदेशीर होर्डिंग उभे करण्यात आले होते, असे एफआयआर मध्ये म्हटले आहे.