मद्यपी दुचाकीस्वाराला मारहाण प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

मद्यपी दुचाकीस्वाराला मारहाण प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

वाहन चालकावर कारवाई करायची सोडून त्याला मारहाण केल्याचा प्रकार माहीम वाहतूक चौकी येथे घडला. या मारहाणीत दुचाकीस्वाराच्या कवटीला दुखापत झाली असून या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात वाहतूक विभागाच्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

इम्रान खान (३२) असे मारहाणीत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. विलेपार्ले पूर्व येथे राहणारा इम्रान खान हा एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. १३ ऑगस्ट रोजी रात्री मोटारसायकल वरून इम्रान खान हा पत्नीसह मरिन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी गेला होता. तेथेच त्याने पत्नीसोबत एका हॉटेलमध्ये जेवण केले व बियर प्यायला. त्यानंतर त्याने पत्नीला टॅक्सीने घरी जाण्यास सांगितले व स्वतः मोटारसायकलने विलेपार्लेच्या दिशेने निघाला होता.  

माहीम वाहतूक चौकी जवळ रात्री वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू असताना वाहतूक पोलीस शिपाई भूषण भानुदास शिंदे यांनी इम्रान याची मोटारसायकल अडवून त्याची ब्रेथ अनालायझर चाचणी केली असता तो मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आले. वाहतूक पोलिसांनी त्याला जवळच असलेल्या माहीम वाहतूक चौकीत आणले व त्याला पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगितला. त्याने त्याच्याजवळ पैसे नसल्याचे पोलिसांना सांगितले असता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माहीम पोलीस ठाण्यात आणण्यात आले.  

हे ही वाचा:

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !

मुख्यमंत्र्यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न कोणाचा?

बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्रेयसीने त्याच्या मुलाचा घेतला जीव !

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक ! 

इम्रान याने वाहतूक पोलिसांनी पकडलेला हात सोडविण्यासाठी हाताला हिसका दिल्यामुळे पोलीस शिपाई भानुदास यांनी त्यांच्या डोक्यावर हाताने मारहाण केली. मारहाणीमुळे इम्रान रडू लागला म्हणून वाहतूक पोलिसांनी त्याला पून्हा वाहतूक चौकीत आणले. त्याच वेळी इम्रानची पत्नी आली व त्याने पत्नीला पोलिसांनी मारहाण केल्याचे सांगितले. इम्रानच्या पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार केली.  

तक्रार दाखल करण्यासाठी माहीम पोलीस ठाण्यात आणले, पोलीस ठाण्यात इम्रानने डोके दुखते म्हणून तक्रार केली असता त्याला उपचारासाठी भाभा रुग्णालयात आणून त्याच्या डोक्याचे एक्सरे काढले असता त्यात इम्रानच्या डोक्याला आतून इजा झाली असल्याचे आढळून आले. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई भानुदास शिंदे यांच्याविरुद्ध जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version