माहीम येथील सेंट मायकल चर्चला लागून असलेल्या स्मशानभूमीत सुमारे १८ थडगे आणि पवित्र क्रॉसची तोडफोड करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम मोहम्मद अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. दाऊद इब्राहिम हा तरुण आईच्या मृत्यूमुळे मानसिक दृष्ट्या खचलेला असून या मानसिकतेतून त्याने हे कृत्य केले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
माहीम येथील चर्च मधील सुमारे ४००वर्षे जुने १८ क्रॉस आणि थडग्याची तोडफोड आणि नासधूस करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. या घटनेमुळे ख्रिचन समुदायात संतापाचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी चर्चचे फादर लॅन्सी पिंटो, यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
चर्चमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका संशयित तरुणाचे फुटेज पोलिसांना मिळून आले होते, या फुटेजच्या मदतीने या तरुणाचा शोध घेण्यात आला असता हा तरुण नवी मुंबईतील कळंबोली येथे मामाकडे राहण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी कळंबोली येथून दाऊद इब्राहिम अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा:
धारावीत लव्ह जिहाद; गोमांस खात नसल्यामुळे विवाहितेची हत्या
४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडायचे हे सोपे काम नव्हते
जितेंद्र आव्हाड गीता आणि कुराण घेऊन म्हणतात, मी कायदा हातात घेईन!
अन्सारीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, तो पूर्वी नवी मुंबईत त्याच्या मामाच्या दुकानात काम करत होता आणि तो वर्षभरापूर्वी आईच्या मृत्यूमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका आठवड्यापूर्वी, आरोपी एका मशिदीत गेला होता, त्या ठिकाणी तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत होता. मशिदीत आलेल्या लोकांना ते खटकले आणि त्याला मशिदी बाहेर हाकलून लावले होते. शनिवारी तो पहाटेच्या सुमारास माहीमला ट्रेनने आला होता, फूटओव्हर ब्रिजचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडून स्थानकाच्या बाहेर आला. तेथून तो माहीम चर्चला लागून असलेल्या स्मशानभूमी गेला,चर्चच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिले आणि त्याला वाटले की तो संगमरवर दगड चोरण्यासाठी आला आहे. सुरक्षा रक्षकाने त्याचे फोटो काढून त्याला हाकलून लावले. त्या नंतर,सुरक्षा रक्षकाने स्मशानभूमीची पाहणी केली तेव्हा त्याला क्रॉस आणि थडगे तोडफोड झाल्याचे लक्षात आले, अशी माहिती चर्चचे फादर यांनी दिली.