फेसबुक मेसेंजरवर ठरत होती दरोड्याची योजना! मग…

फेसबुक मेसेंजरवर ठरत होती दरोड्याची योजना! मग…

फेसबुक हे असे सोशल माध्यम आहे की, या माध्यमाने सर्वात जुने मित्र मंडळींना एकत्रित आणले आहे. एकत्र आलेल्या जुन्या मित्रांनी भेटीच्या योजना देखील या फेसबुकच्या माध्यमातून आखलेल्या असतील. मात्र या फेसबुक या सोशल माध्यमाचा वापर एका गुन्हेगार टोळीने दरोडा टाकण्यासाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.फेसबुकवर योजना आखून घरफोड्या करणाऱ्या या टोळीतील दोन सदस्यांना मुंबई पोलिसांनी दिल्ली आणि बिजनौर येथून अटक केली आहे.

साकिब शौकत अली अन्सारी आणि साहिल हारुन चौधरी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी गेल्या महिन्यात मालाड पश्चिम येथील एका महिलेच्या घरात ती नसतांना घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज लुटला होता. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालाड पोलीसांच्या गुन्हा प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका फुटेज मध्ये दोघे जण संशयितरित्या आढळून आले. त्यापैकी एकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

साकिब शौकत अली अन्सारी असे ओळख पटविण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो काही महिन्यांपूर्वी येरवडा तुरुंगातून बाहेर आलेला असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. तपास पथकाने त्याची माहिती मिळवून त्याला बिजनौर येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता दुसरा आरोपी साहिल हारुन चौधरी याचे नाव समोर आले. त्याच्याबद्दल माहिती विचारली असता फेसबुकवर त्याची ओळख झाली होती, फेसबुकच्या मेसेंजर वर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. फेसबुक मेसेंजरवर हे दोघे दरोड्याची योजना आखत होते. भेटीगाठी बाबत देखील हे दोघे फेसबुक मेसेंजरवर चर्चा करीत होते, अशी माहिती साकीबच्या चौकशीत समोर आले.

हे ही वाचा:

फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

उदयपूरनंतर आता बिहारमध्ये नुपूरप्रकरणी एका तरुणाला भोसकले

 

तपास पथकाने दुसरा आरोपीचा शोध घेण्यासाठी साकीबला त्याला फेसबुक मेसेंजर वर मेसेज करून दिल्ली रेल्वे स्थानकावर भेटायला बोलावून घेतले. चौधरी हा तिकडे भेटायला आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत या दोघांनी गुन्हा कबूल केला असून हे दोघे घरफोडी, दरोड्याची योजना, भेटीचे ठिकाण हे फेसबुक मसेंजरवर करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Exit mobile version