ईडी अधिकारी असल्याचे सांगत ‘स्पेशल २६’चा प्रयोग

तोतया ईडी अधिकाऱ्यांच्या २४ तासांत मुसक्या आवळल्या; ३ किलो सोने, २५ लाख लुटले होते

ईडी अधिकारी असल्याचे सांगत ‘स्पेशल २६’चा प्रयोग

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल २६ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. त्यात तोतया सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत एक गँग कशी लूटमार करत असते याचे चित्रण करण्यात आले आहे. मात्र त्यात ती गँग पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरते. अगदी तसाच प्रसंग झवेरी बाजारात घडला, त्यात तब्बल ३ किलो सोने आणि २५ लाखांची रोकड असा ऐवज लंपास करण्यात आला होता. पण यावेळी मात्र पोलिसांनी गँगच्या मुसक्या २४ तासांच्या आत आवळल्या.

त्याचे झाले असे की, झवेरी बाजारातील इमारतीत  व्ही. बी. बुलियन नावाने व्यवसाय चालतो. तिथे २३ जानेवारीला दुपारी २ वाजता फिर्यादी व त्याचे कामगार कार्यालयात काम करत असताना जेवणावेळी दोन अनोळखी इसम दुकानात शिरले. त्यांनी कामगार माळी याच्या कानशिलात लगावली व ईडी कार्यालयातून आल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व कामगारांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. कार्यालयातील रोख रक्कम एकत्र करण्यास सांगितली. पण आपल्याकडे एवढे सोने नसल्याचे कामगारांनी सांगितले. तेव्हा त्यांच्याकडून या इसमांनी चावी काढून घेतली. समोरील कपाट उघडले असता त्यात २५ लाखांची रोकड होती. ती या इसमांनी ताब्यात घेतली.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४…

राष्ट्रीय बालिका दिन; मुलींच्या कर्तृत्वाला समर्पित दिवस

दोन्ही इसमांनी कामगारांचे खिसे तपासल्यावर त्यात २.५ किलो (२२ कॅरेट) सोने होते. शिवाय काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये ५०० ग्रॅम सोन्याची लगड होती. ती काढून घेण्यात आली. तेव्हा कामगारांनी तुम्ही कोण याची विचारणा केली. त्यांच्या पुन्हा कानशिलात लगावण्यात आली शिवाय, जीवे मारण्याची धमकीही दिली. कामगार माळी याच्या हातात हातकडी अडकविण्यात आली. नंतर हा सगळा ऐवज घेऊन हे इसम इमारतीच्या खाली आले.

तिथे कामगारांना घेऊन हे इसम त्यांच्या जुन्या ऑफिसमध्ये आले. तिथे एक महिला व एक पुरुष कार्यालयातील मॅनेजर विजयभाई शहा याला ताब्यात घेऊन बसलेले होते. तिथे पोहोचल्यावर माळी याच्या हातातील हातकडी काढण्यात आली आणि त्यांना पाठवून देण्यात आले.

त्यानंतर फिर्यादीने आपल्या काकांना बोलावले आणि ईडी अधिकाऱ्यांविषयी सांगितले. ही बाब पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व फिर्यादीचा जबाब नोंदविला. तसेच ३९४, ५०६ (२), १२० (ब) या अंतर्गत गुन्हा नोंदविला.

नंतर तपासातून २४ तासांच्या आत त्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. त्यात मोहम्मद फजल (५०), मोहम्मद रजी अहमद रफी उर्फ समीर (३७) यांचा समावेश आहे. त्या महिलेलाही अटक करण्यात आली असून तिचे नाव विशाखा मुधोळे असे आहे. त्यांच्याकडून १५ लाख रोख मिळाले आहेत. तसेच २.५ किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. या टोळीचे आणखीही काही साथीदार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

या कामात अप्पर पोलिस आयुक्त दिलीप सावंत, अभिनव देशमुख पोलिस उपायुक्त, ज्योत्सना रासम, सहाय्यक पोलिस आयुक्त, ज्योती देसाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक राहुल भंडारे, सपोनि सुशीलकुमार वंजारी, सपोनि बनकर, सपोनि डिगे, सपोनि दराडे, उनि रुपेश पाटील, पोउनि मोकल, पोउनि प्रदीप भिताडे, पोउनि शिवाजी पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकांचे पो. ह. कांबळे, पाटील, परुळेकर, पो.ना. सानप, पो. ना. संदीप पाटील, पो. ना. मुन्नासिंग, शेंडे, वाकसे, बगळे, होटगीकर, गुजर, खांडेकर, साळुंखे, साटम, शिंदे, जोशी, कदम, राठोड यांनी ही कामगिरी करून दाखविली.

Exit mobile version