शस्त्रे खरेदी विक्री प्रकरणात दोन जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. या दोन तरुणांपैकी एक जण शस्त्र विक्री करणारा असून दुसरा शस्त्र खरेदी करणारा असल्याची माहिती परीमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी दिली. या दोघांजवळून ८ पिस्तुल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले असून खरेदी करणारा इसम हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची माहिती राजपूत यांनी दिली.
चेतन माळी (२६) आणि सिनू नरसय्या पडीगेला (४८) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.मानखुर्द परिसरात एक व्यक्ती शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांना मिळाली. पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत, प्रपोनि.अनंत शिंदे विजयसिंग देशमुख,अजय गोल्हार आणि पथकाने १३जानेवारी रोजी चेतन माळी याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ८जिवंत काडतुसे मिळून आली. माळीच्या घरझडतीत पोलिसांना ३ पिस्तुल आणि ५ जिवंत काडतुसे मिळून आली.
त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्याने एक पिस्तुल बोरिवली येथे राहणारा सिनू नरसय्या पडीगेला याला विकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस पथकाने बोरिवली येथून सिनू नरसय्या याला अटक करून त्याच्याकडून १ पिस्तुल आणि २जीवंत काडतुस जप्त केली आहे. दोघांकडे केलेल्या चौकशीत चेतन माळी हा उत्तर प्रदेश तसेच बिहार येथून पिस्तुल आणून त्यांची विक्री मुंबई, ठाण्यात करीत होती अशी माहिती समोर आली.
हे ही वाचा:
कुनो नॅशनल पार्क मधील चित्ता ‘शौर्यचा’ मृत्यू!
विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी
गडचिरोली: नक्षलवाद्यांच्या छाताडावर बसून पोलिसांनी गरदेवाडात बांधली चौकी!
चेतन याने यापूर्वी अनेकांना मोठ्या प्रमाणात शस्त्रे विकली असल्याची माहिती समोर येत असून ज्या लोकांना त्याने शस्त्र विकली त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. तसेच सिनू नरसय्या हा बोरिवली पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी सिनूच्या भावाची हत्या झाली होती, त्याचा सूड घेण्यासाठी सिनू याने चेतन माळी कडून पिस्तुल खरेदी केल्याची संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी तपास सुरू असून या प्रकरणात आणखी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळण्याची शक्यता आहे.