मुंबईतील विविध भागतील इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या दुकानातून लॅपटॉपचोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. या चोरट्यांनी नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतील भागातील इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या दुकानातून आठ लॅपटॉप चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरट्यांकडून एक गाडी आणि आठ लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केले आहेत. धर्मसिंह चौथीलाल मिना आणि आशिषकुमार रामहरी मिना अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
दोघेही आरोपी मूळचे राजस्थान येथील असून ते राजस्थानमधून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात येत असत. त्यानंतर ते त्या परिसरातील इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या दुकानांना भेट देत असत. दुकानांमध्ये लॅपटॉप खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन डिस्प्लेसाठी ठेवलेल्या ज्या लॅपटॉपला बीप पिन लावण्यात आलेले नसतील असे लॅपटॉप ते तेथील कर्मचाऱ्यांच्या नकळत चोरत असत. त्यानंतर ते लॅपटॉप शर्टच्या आत लपवून दुकानातून बाहेर पडत असत. अशाच पद्धतीने त्यांनी पनवेल येथील विजय सेल्स आणि सीबीडीतील क्रोमा इलेक्ट्रोनिक्स शोरूममधून तीन लॅपटॉप चोरले होते.
हे ही वाचा:
परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला का दिले ५ लाख रुपये?
शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?
अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार
संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री
संबंधित चोरी प्रकरणाची तक्रार दाखल होताच गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पनवेल आणि सीबीडीमध्ये घडलेल्या गुन्ह्यासारखेच गुन्हे ठाणे आणि बोरिवली भागातही घडल्याचे गुन्हे शाखेला समजले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील व त्यांच्या पथकाने लॅपटॉप चोरी झालेल्या सर्व ठिकाणांचे सीसीटीव्ही चित्रण व इतर तांत्रिक बाबी यांचा तपास केला असता हे सर्व गुन्हे एकाच टोळीने केल्याचे उघड झाले. तसेच ही टोळी चोरलेले लॅपटॉप विकायला वाशी येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून धर्मसिंह आणि आशिषकुमार यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप व त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी असा सुमारे १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.