विदेशात मोठ्या पगाराचे अमिष दाखवून बेरोजगार तरुणाची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. नोकर भरतीची जाहिरातीचे पत्रक छापून बेरोजगार तरुणांकडून पैसे काढण्याचा धंदा या टोळीने मागील काही वर्षांपासून सुरू केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शाहिद हुसेन मोहम्मद हुसेन शेख (३९) आणि मो. नाजीम मो.शब्बीर मनिहार (४५) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.हे दोघे जोगेश्वरी आणि मालाड परिसरात राहणारे आहेत. या दोघांना दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथून अटक करण्यात आली आहे.
या दोघांनी आपल्या टोळीसह वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाखाली तरुणांना दुबई, सिंगापूर, कुवैत या विदेशात हेल्पर, वेल्डर, कारपेंटर, ईलेक्ट्रीशियन, प्लंम्बर, ड्रॉवर मेसन, पॅकींग हेल्पर इत्यादी नोकरी उपलब्ध असल्याचे एक पत्रक छापून त्या पत्रकात एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. ही पत्रके रेल्वे स्थानक, बसस्टँड, बस स्थानके इत्यादी ठिकाणी चिटकवून तसेच हे पत्रक हातोहात वाटण्यात येत होते.
नोकरीच्या शोधात असणारे ही जाहिरात बघून त्यांच्यावरील क्रमांकावर कॉल करून चौकशी केल्यानंतर त्यांना कार्यालयात बोलावले जात होते.कार्यालयात येणाऱ्या गरजू तरुणांकडून त्यांची कागदपत्रे व काही रक्कम घेऊन त्यांना व्हाट्सअप्प वर बोगस व्हिसा, नोकरीचे पत्र पाठवले जात होते,व तरुणांकडून ऑनलाइन मोठी रक्कम घेतली जात होती.
या टोळीचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर ही टोळी भाड्याचे कार्यालय सोडून रातोरात रफुचक्कर होत होती अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या, या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष ८ चे प्रपोनि. लक्ष्मीकांत साळुंखे आणि पथकाने गुप्त खबर्याच्या आधारे मरीन ड्राईव्ह येथे रॉयल ट्रॅव्हल या कार्यालयावर छापा टाकून दोघाना अटक केली.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड!
चीनचा तैवानवर क्षेपणास्त्र हल्ला?, तैवान परराष्ट्र मंत्र्यांची पळापळ!
प्रयागराज, अयोध्या नंतर गाझियाबादलाही मिळणार नवीन नाव!
मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!
ही टोळी बनावट नावाने भाडयाने घेतलेल्या कार्यालयात बनावट नाव घेवून इच्छूक बेरोजगार तरूणांना परदेशातील नोकरीची माहिती देवून, त्यांच्या कडून त्यांची वैद्यकीय चाचण्या व जॉब अॅग्रीमेंन्ट बनविणे करीता प्रथम काही रक्कम रोखीने घेऊन उर्वरीत रक्कम व्हिसाच्या वेळी घेत होते अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. यापूर्वी या टोळीने वेगवेगळया नावाने खार, जोगेश्वरी, मीरा रोड या ठिकाणी कार्यालय उघडून जवळपास १०० हून अधिक इच्छूक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असल्याची प्राथमिक माहिती मिळून आलेली आहे.
नमूद गुन्हयात दोन जणांना अटक करण्यात आलेली असून अजून साथीदार असल्याचे तपासात निष्पण्ण झाले असून, पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अजून किती ठिकाणी कार्यालये उघडून फसवणूक केलेली आहे याबाबत चौकशी सुरू आहे.