नवी मुंबई येथील सीवूड्स सेक्टर ४४ मधील बालकृष्ण हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये मोठी घरफोडी झाली. ही चोरी ज्यांच्यावर विश्वास होता त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले.
चार सुरक्षा रक्षकांनीच घरफोडीची योजना आखली होती. तिथे राहणारे जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. नंदलाल जैन यांच्या घरी डिलिव्हरी बॉय म्हणून गेलेले आरोपी नवीन रतन विश्वकर्मा आणि कामी भक्ता गोरे हे मूळ नेपाळ येथील रहिवाशी आहेत.
फिर्यादी संदीप जैन यांच्या तक्रारीवरून २४ तासात पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी रोख रक्कम आणि सोने-चांदी अशा एकूण २५ लाख १९ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी २२ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेर जाणार असल्याची पूर्वकल्पना या सुरक्षारक्षकांना होती. त्यामुळेच त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात घुसण्याचा कट रचला गेला. इतर दोन हव्या असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
अधिक चौकशीतून आरोपींच्या विरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीने घरफोडी करण्याआधी आणि ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही फूटेजचा डीव्हीआरही काढून घेतले आणि नंतर घरफोडी केली.
हे ही वाचा:
ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!
कोटी कोटी कर्जात बुडालेल्या एसटीसाठी कोटिंगचा अट्टहास
मुंबईतील मैदानांवर पुन्हा होणार क्रिकेटचा जल्लोष
डीसीपी (झोन १) यांच्या मार्गदर्शनाखाली, एसीपी (तुर्भे) गजानन राठोड आणि एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पोलीस पथकाने विविध मार्गांवर काम करून अखेर दोन आरोपी सुरक्षा रक्षकांना दहिसर आणि पुणे येथून अटक केली. नवीन विश्वकर्मा (३१) आणि कामी बी गोरे (३६) अशी त्यांची नावे आहेत.