वडाळा येथे जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्येचे गुढ अखेर उकलण्यात वडाळा पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय एका बेरोजगार तरुणाला अटक केली आहे, चोरी करण्याच्या उद्देशातून ७० वर्षीय या महिलेची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न अटक करण्यात आलेल्या तरुणाने केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस उपायुक्त ( पोर्ट झोन) संजय लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वडाळ्यातील मुंबई पोर्ट परिसरात गेल्या आठवड्यात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह वडाळा पोलिसांना मिळून आला होता.मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. मात्र मृतदेहाच्या कानातील सोन्याचे कर्णफुले,अंगठी आणि महिलेच्या लाल रंगाच्या केसांवरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.
सुग्राबी हुसेन मुल्ला (७०)असे मृत महिलेचे नाव समोर आले.ही महिला वडाळ्यातील संगम नगर परिसरात राहण्यास होती. या महिलेला दोन मुले असून एक मुलगा नवीमुंबई उलवे येथे राहण्यास असून दुसरा संगम नगर येथे राहत आहे.
हे ही वाचा:
कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण
वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपदरम्यान आतषबाजीने रंगणार नाही
भरधाव दुचाकीची १६ वर्षीय मुलीला धडक; बसनेही चिरडले
‘अन्यथा आम्ही निर्णय घेऊ…’चा नेमका अर्थ काय ?
सुग्राबी ही महिला जवळच असलेल्या एका इमारतीत घरकाम करीत होती. घटनेच्या एक दिवस अगोदर सुग्राबी ही कामावरून घरी जात असताना शहीद भगतसिंग नगर, बीपीटी गेट क्रमांक ५ येथे राहणारा मोहम्मद फैज रफिक सय्यद उर्फ बाबा (२७) याने तीला चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले, सुग्राबी ही मोहम्मद फैज याच्या घरी आली असता फैज याने तिच्या कानातील सोन्याचे कर्णफुले काढण्याचा प्रयत्न केला.सुग्राबी ने विरोध करताच फैज याने रॉडने तिच्या डोक्यात दोन वेळा प्रहार केला, वर्मी घाव बसताच सुग्राबी हि जागीच मृत झाली.
घाबरलेल्या फैज याने तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून गोणीत भरून गोणी खिडकीतून बाहेर फेकली. त्यानंतर मृतदेहाची गोणी पोर्ट ट्रस्ट च्या निर्जन ठिकाणी घेऊन आला, त्यानंतर त्याने सोबत आणलेले रॉकेल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी फैज याला हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.